बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (08:08 IST)

मग आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक

मुंबईमध्ये कोविड-१९ विषाणूचे नवीन व वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या आदेशाने यापुढे मुंबईत यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे आदी देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर येणाऱ्या प्रवाशांना ३सप्टेंबरपासून स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना
# यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या सर्व देशांमधून अथवा या देशांमार्गे मुंबईतील एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व प्रवाशांना ३ सप्टेंबरपासून स्वखर्चाने ‘आरटीपीसीआर चाचणी’ करणे बंधनकारक असणार आहे.
 
# चाचणीच्या अनुषंगाने, याआधीच्या परिपत्रकांनुसार अपवाद करण्यात आलेले सर्व निर्णय आता रद्दबादल करण्यात येत आहेत. (जसे की, पूर्ण / दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, ६५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक इत्यादी)
 
# मुंबईतील एअरपोर्टवर आगमन होणारे अथवा आगमन होवून पुढे जाण्यासाठी दुसरे विमान निवडलेले इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी (यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे वगळता) यांना मागील ७२ तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतर ते विमानतळ सोडू शकतात. असा निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई एअरपोर्टवर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल.
 
# सर्व प्रवाशांनी विहित नमुन्यातील स्वयंघोषणा-पत्र, तसेच हमीपत्र भरुन मुंबई विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱयांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.
 
# सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार एअरपोर्टवर प्रति चाचणी ६०० रुपये याप्रमाणे चाचणीसाठीचे शुल्क आकारण्यात येईल. चाचण्या वेगाने करणे शक्य व्हावे म्हणून प्रतितास सुमारे ६०० प्रवाशांची चाचणी करता येईल, इतक्या क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे.