1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (14:55 IST)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी नाही

mumbai mahapalika
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होतो. यंदाही मेळाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. परंतु, मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. हा वाद सुरू असतानाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्वाळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. महापालिकेकडून परवानगीसाठी चालढकल करण्यात येत असल्याने ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात विघ्न येणार, हे स्पष्ट झालं. त्यानंतर शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.
 
 राणे राहणार उपस्थित?
शिवसेनेला आव्हान देऊन दसरा मेळावा घ्यायचा, तर त्यासाठी मुंबईत एकटय़ा शिंदे गटाची ताकद पुरणार नाही. यामुळे दसरा मेळाव्यासाठी समविचारी नेते, पक्षांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत घेण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने चाचपणी सुरू केली आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होईल, असं विधान केलं आहे. शिंदे यांनी बोलावले तर मी मेळाव्याला जाईन, असंही राणे यांनी म्हटलं आहे.