शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित असतील यासंबंधी तर्क-वितर्क लढवले जात आहे
शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित असतील यासंबंधी तर्क-वितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या आधी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत व आपणच शिवसेना असल्याने दसरा मेळावा घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तसंच यासाठी तयारीला लागण्याचा आदेश सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करतील, असेही त्यावेळी ठरलं.