बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (21:47 IST)

मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश

मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत तब्बल ५४ पदकांवर आपले नाव कोरले आहे. यामध्ये १५ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षा घेण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इंग्रजी परीक्षेसाठी ७५७ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड झाली. त्यातून १०५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी निवड झाली. राष्ट्रीय परीक्षेत ५ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ७ विद्यार्थ्यांनी रौप्य तर ५ विद्यार्थ्यांनी कांस्य असे एकूण १७ पदके पटकावली. या विषयामध्ये सारा मोहम्मद जबीर शेख या विद्यार्थिनीने सुवर्ण पदकासह शिष्यवृत्तीही प्राप्त केली.
 
गणित प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षेकरीता १ हजार ७० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड झाली. त्यामधून १४३ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी निवड झाली. राष्ट्रीय स्तरावर ८ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ७ विद्यार्थ्यांनी रौप्य आणि ४ विद्यार्थ्यांनी कांस्य असे एकूण १९ पदक पटकावले. गणित विषयामध्ये नुझा रशिद खान ही विद्यार्थिनी सुवर्ण पदकासह शिष्यवृत्तीचीही मानकरी ठरली.
विज्ञान प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षेकरीता ७२० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यातून १०२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली. राष्ट्रीय स्तरावर २ विद्यार्थ्यांना सुवर्ण, ४ विद्यार्थ्यांना रौप्य तर १२ विद्यार्थ्यांना कांस्य पदक असे एकूण १८ पदक मिळाले. या विषयात कनिष्का अनुपसिंग सिंग या विद्यार्थिनीला सुवर्ण पदकासह शिष्यवृत्तीही मिळाली.
Edited by : Ratnadeep Ranshoor