बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (07:52 IST)

‘सनराईज’ला रुग्णालयासाठी पुन्हा परवानगी देणार नाही

मुंबईतील भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील अग्निकांडात ‘सनराईज‘ येथील ९ रुग्णांचा दुर्दैवी बळी गेला. या घटनेचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. पालिका प्रशासनाने आता यापुढे कोणत्याही परिस्थितीत ‘सनराईज’ला रुग्णालयासाठी पुन्हा परवानगी न देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. ड्रीम्स मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर भीषण आग लागल्याने या आगीचा धूर तिसऱ्या मजल्यावरील ‘ सनराईज’ रुग्णालयात झपाट्याने पसरला. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त व गंभीर अवस्थेतील ९ रुग्णांच्या नाकातोंडात आगीचा काळा धूर जाऊन त्यांना श्वसनाचा त्रास झाला आणि गुदमरल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 स्थायी समितीच्या बैठकीत भाजप, विरोधी पक्ष व सत्ताधारी शिवसेना यांनी, प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी लावून धरली. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा करण्यात अली असता, यापुढे संबंधित मॉलमध्ये ‘सनराईज’ला रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
मुंबईत त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालय कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली होती. मात्र त्याची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपली असताना रुग्णालय प्रशासनाने ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवून घेतली. ही मुदत संपण्यापूर्वीच म्हणजे २६ मार्च रोजी ड्रीम्स मॉलमध्ये भीषण आग लागली व त्याची मोठी झळ सनराईज रुग्णालयाला बसली त्यामध्ये ९ रुग्णांचा नाहक बळी गेला मात्र आता या दुर्घटनेनंतर  ३१ मार्च रोजी ही मुदत संपली. सध्या ड्रीम्स मॉल व तेथील रुग्णालय बंद स्थितीत असून भविष्यात सनराईजला पुन्हा रुग्णालय सुरू करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.