1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (21:14 IST)

मविआच्या महामोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी

mumbai mahapalika
महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने उद्या,17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाला आधी परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास मिल ते जेजे ब्रिज मार्गे टाईम्स ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. टाइम्सच्या इमारतीसमोर मविआतील नेत्यांची भाषणे होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास येथे सभा होईल.
 
महाराष्ट्रातील विविध समस्यांवरून महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा राणीबाग ते आझाद मैदान असा निघणार होता. मात्र, आता मार्ग बदलण्यात आला असून रिचर्डसन क्रुडास मिल ते टाईम्स ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी सर. जे.जे मार्ग नागपाडा अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभागाकडून परवानगी मागितली होती. पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. या मोर्चाला आडकाठी केली जाणार नाही, असं कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.
 
पोलिसांनी काय नियम लावले?
 
मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे.
मोर्चामध्ये प्राण्यांचा वापर करण्यात येऊ नये.
कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा येणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या कायदेशीर आदेशाचे पालन मोर्चामधील लोकांनी करावे.
मोर्चामध्ये फटाके वगैरे वाजवण्यास प्रतिबंध राहील.
मोर्चामुळे दिलेल्या मार्गावरूनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये.
मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये. मोर्चामध्या वापरण्यात येणारी वाहने सुस्थितीत असावी, तसंच वाहनचालकाकडे उचित परवाना असावा.
मोर्चामध्ये अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना वाहन चालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये.अटीशर्थींसह परवानगी देताना ही परवानगी केवळ मोर्चाकरता आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, लाऊडस्पीकर, वाद्य वाजविणे यासाठी महापालिका आणि वाहूतक पोलीस विभागाकडून परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor