मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (08:11 IST)

औरंगाबाद पोलिसांनी जप्त केला “इतक्या” लाखांचा नायलॉन मांजा

manja
औरंगाबाद : शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 8 लाखांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. नायलॉन मांजामुळे अपघात होऊन जीव जातो. कुटुंब उघड्यावर येते, असे मत व्यक्त करीत पोलिस, मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मांजाविरुद्ध मोहीम राबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.
 
शहर पोलिसांना आदेश मिळताच ते कामाला लागले असून, कारवाई करत आहेत. पोलिसांनी 7 लाख 98 हजारांचा मांजा जप्त केला आहे. तर या प्रकरणी जिन्सी स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुश्ताक खान मुसा खान (वय 45 वर्षे, रा. नवाबपुरा), मनोहरलाल लोचवाणी (रा. सिंधी कॉलनी), मुज्जुभाई अशी आरोपींची नावे आहेत.
 
नायलॉन मांजासंबंधी खंडपीठामध्ये सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान सुनावणीमध्ये नायलॉन मांजावरील कारवाईबाबात खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणीला पोलिसांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी पोलिसांनी 57 कारवाया केल्याचा आकडा सादर केल्यावर एवढ्या कारवाया तर एक दिवसांमध्ये व्हायला पाहिजेत, असे न्यायालयाने सुनावले होते. तसेच नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याचा सूचना केल्या होत्या.
 
न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीनंतर लगेचच औरंगाबाद शहर पोलिसांनी कारवाईचा धडका लावला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने जुना मोंढा भागामध्ये छापा मारला. तर बालाजी लॉजिस्टिक्समध्ये नुकताच ट्रान्सपोर्टने येऊन पडलेला 22 बॉक्समधील नायलॉन मांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यावेळी एकूण 7 लाख 98 हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. मोंढा भागामध्ये छापा मारल्यावर पोलिसांनी तेथील व्यवस्थापक मुश्ताक खानला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केल्यावर त्याने मालक मनोहरलाल लोचवाणी याचे नाव सांगितले आहे.
 
त्यामुळे पोलिसांनी लोचवाणी याला ताब्यात घेताच त्याने चौकशीमध्ये हिना पतंग दुकानाचा मालक मुज्जूभाईचे नाव सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यामधून मोठ्या आकाराच्या 40 चकऱ्या आणि छोट्या आकाराच्या 120 चकऱ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जिन्सी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor