शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (21:56 IST)

बायोडिझेल निर्मितीच्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचे बेकायदा इंधन जप्त

दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील जानोरी औद्योगीक वसाहतीत बेकायदा इंधन निर्मीतीचा काराखाना ग्रामिण पोलिसांच्या भरारी पथकाने छापा टाकून उध्वस्त केला आहे. या कारवाईत पाच जणांना गजाआड करुन पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून दोन भरलेले टँकर व प्लॅस्टिक टाक्या भरलेले ज्वलनशील पदार्थ व इतर साहित्य असा १ कोटी एक लाख ६८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनिल भवानभाई राधाडिया (३७ रा. सुरत, गुजरात), दीपक सूर्यभान गुंजाळ (४१ रा. कोणार्क नगर, नाशिक), इलियास सज्जाद चौधरी ( ४३ हल्ली रा. कुर्ला मुळ उत्तर प्रदेश),अब्रार अली शेख (३७ रा. शिवडी, मुंबई), अजहर इब्रार हुसेन अहमद (२१ रा. नरसिंग गड ता. राणीगंज जि प्रतापगड उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये पोलिसांनी जिह्यातील अवैध धंद्याना लक्ष केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आली. जानोरी औद्योगीक वसाहतीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलची निर्मीती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून छापा टाकला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्लॉट नं.१६ मधील कान्हा इंटरप्राईजेस या कारखान्याच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये संशयित अवैधरित्या डिझेल सदृश्य पदार्थांमध्ये एक ज्वलनशील पदार्थाची भेसळ करीत असताना मिळून आले. अधिक तपास निरीक्षक प्रमोद वाघ याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडूरंग कावळे करीत आहेत.