1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (16:09 IST)

टोले देत , दोन देत चार घेत हिवाळी अधिवेशन पार पडले: संजय राऊत

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलं. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. टोले देत टोले घेत, दोन देत चार घेत त्यांनी अधिवेशन हाताळलं, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. पण त्यांना काही पथ्य आहेत. मात्र, तरीही ते अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून होते, असं सांगतानाच विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडलं. अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने अधिवेशन पार पडलं, असं राऊत म्हणाले.
 
उत्तर प्रदेशात पीयूष जैन या अत्तराच्या व्यापाऱ्याकडे कोट्यवधीचं घबाड सापडलं. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पार्टीवर निशाना साधला आहे. उत्तर प्रदेशात तापलेल्या या अत्तराच्या राजकारणावरूनही राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं. एवढा आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका अत्तर व्यापाऱ्याकडे घबाड मिळालं. महागडं अत्तर मिळाल्याने प्रत्येकाला वाटत आपण अत्तर विकावं. आता हे अत्तर कुणाचं नक्की? इतके दिवस कोण अंगाला चोपडून राजकारण करत होतं? याच्यावर वास सुरू आहे. पण राजकारणात प्रत्येकाला अत्तराची गरज आहे. कुणी कितीही टीका केली तरी अशा अत्तराच्या सुंगधाशिवाय कोणीच राजकारण करू शकत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
 
राजकारणात सर्व मोठे लोक अशा प्रकारचं महागडं अत्तर घरात ठेवत असतात. मात्र दुसऱ्यांच्या घरात मिळाल्यावर त्याची चर्चा होते. लखनऊ, कनौज, कानपूरमध्ये जवळपास २५० कोटींचं पेपर परफ्यूम, रोकड, दागिने मिळाली आहे. कलरफूल. आता त्यावर राजकारण होत आहे. गोव्यात काय चाललंय? उत्तर प्रदेशात काय चालणार? पंजाबात काय होणार? याच परफ्यूमचा वापर करून तुम्ही निवडणुका लढणार आहात आणि जिंकणार आहात. राजकारणाच्या हमाम में सब नंगे है. मग तुम्ही कितीही अत्तर लावा. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असंही ते म्हणाले.