शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (14:42 IST)

जे.जे. आणि जीटी रूग्णालयात मिळणार ही आधुनिक वैद्यकीय उपकरणे; १९ कोटींचा निधी मंजूर

JJ hospital
मुंबई – जे.जे. (सर ज.जी.समूह रुग्णालय) आणि जीटी (गोकुळदास तेजपाल) रूग्णालयांसाठी 19 कोटी रूपयांची आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजुरी दिली आहे.
 
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी जे.जे., कामा तसेच जीटी रूग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन वैद्यकीय यंत्रसामग्रीची पाहणी केली होती. जे.जे. रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशीन व एमआरआय मशीन जुनी झाल्याने तातडीने नवीन मशीन खरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.
 
याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन यंत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या होत्या. ही यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता देऊन एकूण 19 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापैकी जेजे रूग्णालयातील ॲन्जिओग्राफी उपकरणासाठी पाच कोटी 70 लक्ष रूपये तर जीटी रूग्णालयातील स्कॅनर व एमआरआय उपकरणासाठी 13 कोटी 56 लक्ष रूपये खर्च होणार आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor