शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (15:33 IST)

असे सुरु आहे आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन, जेवण आणि आरोग्याची घेतली जात आहे विशेष काळजी

दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर मोठया संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आझाद मैदानावर पोहोचले आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा या शेतकरी आंदोलनला पाठिंबा आहे.
 
आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दादर येथील गुरुद्वाराने शेतकऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पुलावची पाकिटे, फळं, डाळ आणि चपातीची व्यवस्था केलीय. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणामध्ये केळी, डाळ-चपातीचे वाटप झाले. 
 
मोर्चा लक्षात घेऊन पालिकेने स्वच्छतेसाठी सफाई कामगार, पिण्यासाठी पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटपही सुरू केले. मोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पालिकेने आझाद मैदान परिसरात वैद्यकीय शिबिराची  व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक तेथे तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास करोना चाचणीही करण्यात येत आहे.