शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (21:11 IST)

परमबीरसिंग प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत रूज

prambir singh
मुंबई – गेल्या काही महिन्यांपूर्वी केवळ मुंबई आणि राज्यातच नव्हे तर देशभरात परमवीरसिंग प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर या प्रकरणाला वेगवेगळ्या प्रकारे कलाटणी मिळाली. कालांतराने राज्याच्या राजकारणात बरेच बदल झाले. तसेच सत्तांतरही झाले, त्यामुळे परमवीरसिंग प्रकरण मागे पडले, असे वाटत असताना पुन्हा एकदा हे प्रकरण वेगळ्याच कारणाने समोर आले आहे. याला कारण म्हणजे या प्रकरणातील दोन निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे, याप्रकरणी आता विरोधक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
परमबीरसिंग प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके अशी सेवेत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्यांची नावे आहे. कारण अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कारण परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती.
 
गृह विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यां विरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सुमारे १० महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
 
व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
 
मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे. तसेच परमबीर सिंह खंडणीप्रकरणात गोपाळे आणि कोरके यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, शिंदे – फडणवीस सरकार येताच गोपाळे आणि कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र या निर्णयावर विरोधक काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वास्तविक पाहता कोणतेही निर्णय घेताना त्याचा सारासार विचार करायला हवा असे म्हटले जाते.

Edited by : Ratnadeep Ranshoor