मुंबईतून बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक
सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे अपहरण करून विक्रीसाठी हैदराबादला नेऊन पुन्हा मुंबईकडे निघालेल्या दोन महिलांना सोलापुरात रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. अपहरणानंतर अवघ्या ४८ तासांत ही कारवाई यशस्वी झाली.
यासंदर्भात सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून दोन महिला हैदराबादला गेल्या आणि तेथून पुन्हा मुंबईला हुसेन सागर एक्स्प्रेसने येत असल्याची माहिती मुंबईच्या बांद्रे गुन्हे शाखेने सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाला कळविली होती. दोन्ही महिला अपहृत बाळाची विक्री करण्याच्या हेतूने हैदराबादला गेल्या होत्या. परंतु व्यवहार फिसकटल्यामुळे दोन्ही महिला अपहृत बाळाला सोबत घेऊन पुन्हा मुंबईकडे येत असल्याचे कळविले होते.
त्यानुसार सोलापूर रेल्वे स्थानकावर हुसेनसागर एक्स्प्रेस आली असता रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने संपूर्ण रेल्वे गाडीची तपासणी केली. तेव्हा एका जनरल बोगीमध्ये दोन संशयित महिला बाळासह आढळून आल्या. तिकीट तपासणीचा बहाणा करून त्यांना रेल्वेतून खाली उतरवून ताब्यात घेण्यात आले.
Edited By- Ratnadeep Ranshoor