रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (07:56 IST)

मुंबईत संपूर्ण लसीकरण ठप्प होणार

मुंबईत  लसीच्या तुटवड्यामुळे खासगी २६ केंद्रे आणि पालिकेचे राजावाडी, कांदिवली शताब्दी, माहीम प्रसूतीगृह आणि शक्यन रुग्णालय ही चार केंद्रे अशी एकूण ३० केंद्रे एकाच दिवसांत बंद पडली आहेत. आता जेमतेम दीड – दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक राहिला असून त्यानंतर  मुंबईत संपूर्ण लसीकरण ठप्प होणार   आहे.
 
लसीच्या तुटवड्यामुळे सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपात राजकारण सुरू झाले आहे. मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शहर व उपनगरे येथील ११८ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण १५ लाख २३ हजार ८१८ लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे १६ जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत लसीकरणाचा साठा संपत आला आहे. राज्यातही पुणे, सांगली व सातारा येथील लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. आता पुढील दोन दिवसांत तिचं परिस्थिती मुंबईत बघायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
मुंबईत ११८ ठिकाणी लसीकरण केले जाते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या ३३, राज्य आणि केंद्र सरकारच्या १४ आणि खासगी रुग्णालयात ७१ केंद्रांवर लसीकरण केले जाते. याच ७१ खासगी केंद्रांपैकी २६ लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे राजावाडी, सायन, कांदिवली शताब्दी, माहीम प्रसुतीगृह अशी चार केंद्रे एकूण ३० केंद्रे बंद पडली आहेत.
 
मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे तर राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र मुंबईला १५ एप्रिलपर्यँत लसीचा साठा मिळणार असल्याने तोपर्यंत लसीकरण केंद्र बंद स्थितीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला लसीचा जास्तीत जास्त साठा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका राज्याकडे व केंद्राकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.