गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (21:41 IST)

मुंबईच्या काही भागात पाणीकपात

मुंबईच्या उदंचन केंद्रात झडप बसविण्याच्या कामासाठी संपूर्ण पश्चिम उपनगरात, शहर भागातील माटुंगा, वडाळा, अँटॉप हिल, शिवडी आदी भागात व पूर्व उपनगरातील कुर्ला, घाटकोपर या काही भागात २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ या कालावधीत १०% पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा अगोदरच भरून ठेवावा व त्याचा जपून वापर करावा. पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पालिका जल अभियंता खात्यामार्फत करण्यात आले आहे.
 
मुंबई महापालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामासाठी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांकरीता सदर उदंचन केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सदर कालावधीत संपूर्ण पश्चिम उपनगर भागात, शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर म्हणजे वडाळा, माटुंगा, परळ, अँटॉप हिल, शिवडी आदी भागात आणि पूर्व उपनगरातील एल, एन विभागात म्हणजे कुर्ला व घाटकोपर या भागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
 
मुंबई महापालिकेने, मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हे उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्र हे २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.
 
त्यामुळे, भांडुप संकुलास होणाऱया पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. परिणामी, भांडुप संकुलद्वारे होणाऱया पश्चिम उपनगरे तसेच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱया पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.