बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (08:15 IST)

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र

ठाण्यात विवियाना मॉलच्या वाहनतळामध्ये महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रावर बुधवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून याठिकाणी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या केवळ १०० ज्येष्ठांनाच कोविशिल्डची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.
 
ठाणे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. या रांगेत ताटकळत उभे राहून ज्येष्ठांना लस घ्यावी लागत होती. तसेच सहव्याधींमुळे काही ज्येष्ठांना रांगेत उभे राहून लस घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा नागरिकांची लसीकरणादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने विवियाना मॉलच्या वाहनतळामध्ये ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रावर बुधवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत असून या केंद्रावर दुपारी २ ते ५ या वेळेत लस दिली जाणार आहे. या केंद्रावर केवळ कोविशिल्डचा दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. पहिल्या मात्रेसाठी नोंदणी करणाऱ्यांना येथे लस देण्यात येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच आहे. लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्तीच सोबत असावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.