गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

शिवाजी पार्कवर 'राज गर्जना'

20 हजार भय्ये आले तर 40 हजार पाय जातील

न्यायालयाच्या भाषण बंदीच्या आदेशाची मुदत संपल्या नंतर काल शिवाजी पार्क मैदानावर मनसे नेते राज ठाकरे नावाची तोफ पुन्हा धडाडली.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेवर सडकून टीका करतानाच 'मराठी माणसा जागा हो'चा नाराही त्यांनी लगावला. अगदी तुडुंब भरलेल्या मैदानावर कार्यकर्त्यांमध्ये सळसळता उत्साह संचारावा असे भाषण करत राज यांनी आदेशाची वाट पाहत बसू नका असा उपदेशही आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

राजकारणातील अभ्यासू आणि दिग्गज नेत्यांनाही लाजवेल असे संदर्भ राज यांनी त्यांच्या भाषणात दिले.आपण आज पूर्ण तयारीनिशी आल्याचे सांगत मराठी माणसासाठी आपल्याला कितीही वेळेस तुरुंगात जावे लागले तरी आपल्याला त्याची पर्वा नसल्याचे ते म्हणाले.

उत्तर भारतीयांवर टीका करतानाच राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानासमोर छट पुजा करून दाखवू असे आव्हान देणार्‍या रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांची त्यांनी त्यांच्याच शैलीत खिल्ली उडवली. हिंमत असेल तर लालूंनी कृष्णकुंजपूढे छटपुजा करून दाखवावी आणि परत बिहारमध्ये परतून दाखवावे असा इशाराही राज यांनी दिला.


मराठी माणसाला सारखे कोणी ना कोणी डिवचण्याची गरज लागते याची खंत व्यक्त करतानाच आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी 1922 मध्ये हे काम सुरू केले होते, यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही हेच काम केले, आता आपल्यालाही मराठी माणसाला जागे करण्यासाठी हेच काम करावे लागते आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


लालूप्रसाद यादव, अमरसिंह, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन यांच्यासह काही महाराष्ट्रीयन नेत्यांवरही राज यांनी आपल्या खास शैलीत टीकेची झोड उडवली.


तुडुंब भरलेल्या शिवाजी पार्कवर राज यांच्या प्रत्येक वाक्याला कार्यकर्ते उत्स्फूर्त दाद देत होते. आपल्याला अटक होण्याची मुळीच भिती नसल्याचे सांगतानाच मराठी सरकारी कर्मचार्‍यांनी चिरीमिरीसाठी मराठींचे नुकसान करणे थांबवावे असा सल्लाही त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांना दिला.