रविवार, 2 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 24 एप्रिल 2021 (20:15 IST)

ऑक्सिजन तुटवड्यामुळे 20 रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजन टँकर दाखल

ऑक्सिजन तुटवड्यामुळे दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमधल्या 20 रुग्णांचा मृत्यू झालाय.
 
दिल्लीतल्या रोहिणी भागात असलेल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आता फक्त अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उरला असल्याचं या हॉस्पिटलने सकाळी म्हटलं होतं.
 
यानंतर दुपारी साडेबारा वाजल्यानंतर ऑक्सिजन टँकर या हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय.
 
या हॉस्पिटलमध्ये 200 रुग्ण असून यापैकी 80 ऑक्सिजन सपोर्ट तर 35 जण ICU मध्ये आहे.
 
काल रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अतिशय अत्यवस्थ असणाऱ्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं PTI वृत्तसंस्थेने म्हटलंय.
 
ऑक्सिजन पुरवठ्याची आपण वाट पाहत असून कोव्हिड 19च्या 215 रुग्णांना याची तातडीची गरजच असल्याचं हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकांनी म्हटलंय.
 
ज्या 20 जणांचा मृत्यू झाला त्यातले बहुतेकजण कोव्हिड-19चे रुग्ण होते आणि या हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये अॅडमिट होते, असं हिंदुस्तान टाईम्सने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत म्हटलंय.
 
हॉस्पिटलकडचा ऑक्सिजन साठा संपल्याने ऑक्सिजनचं प्रेशर कमी झालं आणि या सगळ्या रुग्णांचा मृत्यू झाला.
 
या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक दीप बलूजा म्हणाले, "क्रिटिकल केअर युनिटमध्ये हाय प्रेशर ऑक्सिजन पुरवठा देण्यात येत असलेले सगळे पेशंट्स आम्ही गमावले. शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत आमच्याकडचा लिक्विड ऑक्सिजनचा सगळा साठा संपला. यानंतर आम्ही मेन गॅस पाईपलाईनला जोडलेल्या ऑक्सिजन सिलेंडर्सचा आधार घेतला. पण तिथलं प्रेशर लो असल्याने रुग्णांचा मृत्यू झाला."