शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (15:16 IST)

अभिसार शर्मा यांच्यासह 'न्यूजक्लिक'च्या पत्रकारांच्या घरी छापेमारी, मोबाईल-लॅपटॉप जप्त

'न्यूजक्लिक' या वृत्त संकेतस्थळाशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (3 ऑक्टोबर) सकाळी छापे टाकल्याचं वृत्त आहे.
वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी पहाटे पहाटे घरात छापा टाकून, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केल्याची माहिती अभिसार शर्मांनी दिली.
 
वरिष्ठ पत्रकार भाषा सिंग यांनीही एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, "या फोनवरून हे शेवटचं ट्वीट. दिल्ली पोलिसांनी फोन जप्त केला आहे."
 
या छापेमारीनंतर अनेक पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या छापेमारीचा निषेध व्यक्त केलाय.
 
न्यूजक्लिक वेबसाईटशी संबंधित काही पत्रकारांना लोधी रोड येथील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल मध्ये नेण्यात आलं आहे.
 
या छाप्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रकारांच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून माहिती गोळा करण्यात आली आहे. अमेरिकेतील लखपती नेविल रॉय सिंघम यांच्याकडून चीनच्या समर्थनार्थ बातम्या पसरवण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रेस क्लब ऑफ इंडियानं म्हटलं आहे की, “न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर टाकलेले छापे अत्यंत चिंताजनक आहेत. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही पत्रकारांच्या पाठीशी उभे असून याबाबत अधिक माहिती द्यावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करतोय."
काही काळापूर्वी या न्यूज पोर्टलवर चीनकडून निधी घेतल्याचा आरोप झाला होता आणि ईडीनं गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
 
या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झाल्याचं वृत्त नाही. दिल्ली पोलिसांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.
 
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ऑगस्टमध्ये काय म्हणाले होते?
ऑगस्ट महिन्यातही हे न्यूज पोर्टल चर्चेत होतं. या वेबसाईटचा हवाला देत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
 
“राहुलजींच्या बनावट प्रेमाच्या दुकानात चिनी वस्तू येऊ लागल्या आहेत," असा आरोप त्यांनी केला होता.
 
एका अजेंड्याचा भाग म्हणून भारताविरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला होता.
अनुराग ठाकूर ऑगस्टमध्ये म्हणाले होते, "2021 मध्येच आम्ही न्यूज क्लिकबद्दल उघड केलं की भारताविरोधात विदेशी शक्ती कशा काम करताहेत, भारताविरोधात कसा प्रचार केला जातोय. आणि अँटी इंडिया, ब्रेक इंडिया मोहिमेत काँग्रेस आणि विरोधी पक्ष त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले.
 
त्यानंतर त्यांनी आरोप केला होता की, "चिनी कंपन्या नेव्हिल रॉय सिंघमच्या माध्यमातून न्यूज क्लिकला निधी देत आहेत. पण त्यांचे सेल्समन भारतीय आहेत."
 






















Published By- Priya Dixit