1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (17:14 IST)

बाळाला जन्म देऊन आईने त्याच दिवशी दिली मॅट्रिकची परीक्षा

- विष्णू नारायण
बिहारमधील बांका जिल्ह्यातल्या एका महिलेने दाखवलेल्या धैर्याची आणि विश्वासाची सध्या चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये सध्या मॅट्रिकच्या परीक्षा सुरू आहेत. 22 वर्षीय रुक्मिणी देखील ही परीक्षा देणार होती.
 
गरोदर असताना देखील रुक्मिणीने परीक्षेची तयारी केली. 14 फेब्रुवारीला तिचा गणिताचा पेपर होता.
 
पेपर संपल्यानंतर तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिच्या घरापासून जवळ असणाऱ्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. 15 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता तिने एका मुलाला जन्म दिला.
 
मुलगा जन्माला आला म्हणून कुटुंबातील सर्वच लोक खुश होते. पण दुसऱ्या बाजूला रुक्मिणीने असा एक निर्णय घेतला ज्यामुळे ती बातम्यांमध्ये चर्चेत आली.
 
मुलाच्या जन्मानंतर काही तासांतच तिचा मॅट्रिकचा पेपर सुरू होणार होता. आणि रुक्मिणीने देखील या पेपरला बसण्याचा निर्धार केला.
 
पण अशा परिस्थितीत ती परीक्षा देऊ शकेल का? असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांनी तिला विचारला. रुक्मिणी मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती.
 
त्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली.
 
डॉक्टरांनी काय सांगितलं?
रुक्मिणीचा आग्रह आणि धाडस बघून डॉक्टरांनी तिला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.
 
स्थानिक रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर भोलानाथ यांनी मिडीयाशी बोलताना सांगितलं की, "सर्वांनी रुक्मिणीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने धरलेल्या आग्रहापुढे कोणाचंच काही चाललं नाही."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "परीक्षेबद्दलचा तिचा उत्साह बघितल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने देखील तिला मदत करण्याचा निर्णय घेतला.
 
"त्यांनी रुक्मिणीला अॅम्ब्युलन्समधून परीक्षा केंद्रावर ने आण करण्याची व्यवस्था केली. शिवाय तिला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याची काळजी प्रशासनाने घेतली," डॉक्टर भोलानाथ यांनी सांगितले.
 
रुक्मिणी बांका जिल्ह्यातील कटोरिया ब्लॉकमधील एका शाळेची विद्यार्थिनी होती. तिच्या माहेरच्या घरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेलं पैलवा गाव तिचं सासर आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर तिची शाळा बंद झाली.
 
बीबीसीशी बोलताना रुक्मिणीचे सासरे सुरेंद्र दास सांगतात, "ती अभ्यासात हुशार आहे, पण लग्नानंतर तिचा हा अभ्यास मागे पडला."
 
ते सांगतात, "रुक्मिणीला मॅट्रिकची परीक्षा द्यायची होती, म्हणून आम्ही कोणतीही कमतरता ठेवली नाही. डिलिव्हरी नंतर तिने दोन पेपर हॉस्पिटलमधूनच येऊन जाऊन दिले. आता ती घरी आलीय. त्यामुळे राहिलेले पेपर ती घरुन देते आहे. आमचं संपूर्ण कुटुंब तिच्यासाठी खुश आहे."