सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (10:06 IST)

अमृतपाल सिंह 'फरार', वारिस पंजाब दे संघटनेचे 78 जण ताब्यात

पंजाब पोलिसांनी शनिवारी (18 मार्च) 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि संघटनेच्या इतर सदस्यांविरोधात कारवाईचं राज्यव्यापी अभियान सुरू केलंय.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतपाल सिंह आतापर्यंत पोलिसांना सापडला नाही. मात्र, आतापर्यंत त्याच्या संघटनेच्या 78 जणांना अटक करण्यात आलीय.
 
इतर काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 9 शस्त्रं जप्त केली.
 
ज्यांच्यावर अनेक विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरच कारवाई करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या कारवाईमुळे राज्यात अनेक ठिकाणी तणाव आहे. पोलिसांनी पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम-144 लागू केला असून, इंटरनेट आज (19 मार्च) दुपारपर्यंत बंद केलंय.
 
पोलिसांच्या कारवाईविरोधात काही ठिकाणी निदर्शनंही झाली.
 
दुसरीकडे, पंजाबचे कॅबिनेट मंत्री बलबीर सिंह यांनी म्हटलं की, ही कारवाई कायद्यानेच होत आहे.
 
अमृतपाल सिंह 'फरार'
पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (18 मार्च) दुपारनंतर पोलिसांनी जालंधर जिल्ह्यातील शाहकोट मालसैन रोडवर 'वरिस पंजाब दे' संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना पकडलं. यातल्या सातजणांना तिथेच अटक करण्यात आली.
 
पोलीस प्रवक्त्यांनुसार, अमृतपाल सिंह याच्यासह अनेकजण पळाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी व्यापक स्तरावर अभियान सुरू आहे.
पोलिसांनी राज्यभरात चालवलेल्या या अभियानादरम्यान 9 शस्त्रं जप्त करण्यात आली. त्यात एक 315 बोरची रायफल, 12 बोरच्या सात रायफल, एक रिव्हॉल्व्हर आणि 373 काडतुसं जप्त करण्यात आली.
 
पोलीस प्रवक्त्यांच्या माहितीनुसार वारिस पंजाब दे संघटनेशी संबंधित लोकांवर चार गुन्हेगारी प्रकरणं आहेत. यात लोकांमध्ये वैमनस्य पसरवणं, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला आणि पोलीस कारवाईत अडथळे आणणे, यांचा समावेश आहे.
 
वारिस पंजाब दे संघटनेविरोधात अजनाला पोलीस ठाण्यावरील हल्ला करण्यासंदर्भातही गुन्हा दाखल आहे. गुन्हा करणाऱ्या सगळ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली.
 
दरम्यान, अमृतपाल सिंगच्या अटकेसाठीची मोहीम राबवताना अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी राज्यात सर्वत्र इंटरनेट बंद केलेलं आहे.
 
पंजाबच्या जालंधर आणि शाहकोट परिसरात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून येथे जमावबंदीचा आदेशही देण्यात आला आहे.
 
दुसरीकडे, अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी त्याच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ रस्त्यावर ठाण मांडली आहे. त्यांनी पोलिसांची कारवाई रोखण्यासाठी आंदोलन पुकारलं असून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
 
यामुळे पोलीस आणि अमृतपाल समर्थक आमनेसामने आल्याचं चित्र आहे.
पोलीस स्टेशनवर काढला होता मोर्चा
'वारीस पंजाब दे' संघटनेच्या समर्थकांनी अमृतसरजवळील अजनाला येथील एका पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात मोर्चा काढला होता.
 
या संघटनेचे समर्थक बंदुका आणि तलवारी घेऊन आपल्या प्रमुखाला म्हणजेच अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग याची सुटका करायला गेले होते.
 
पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा पोलीस जखमी झाले.
 
अमृतपाल सिंगही आपल्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता.
 
त्याने पोलिसांना 'अल्टीमेटम' दिला असून संघटनेच्या हजारो समर्थकांनी पोलिस स्टेशनमध्ये एवढा गोंधळ घातला की पोलिसांना लवप्रीत सिंगच्या सुटकेचं आश्वासन द्यावं लागलं. अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांसमोर पोलीस हतबल झाल्याचं दिसून आलं.
अमृतपाल म्हणाला की, "अमृतपाल हताश आहे, तो एकटा पडलाय असं काही वृत्तपत्रांत छापून आलंय... पण भक्तांनी मला कशापद्धतीने पाठिंबा दिलाय हे तुम्हाला दिसलंच असेल."
 
अमृतपाल सिंग नेमका आहे तरी कोण?
मागील काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात अमृतपाल सिंगच्या नावाची चर्चा जोरावर आहे.
 
29 वर्षीय अमृतपाल सिंग खलिस्तान समर्थक असल्याचं म्हटलं जातं. मागच्या वर्षी ॲक्टर-ॲक्टिविस्ट असलेल्या दीप सिंग सिद्धूचं निधन झालं.
 
दीप सिंग सिद्धूने ह्यात असताना 'वारीस पंजाब दे' या संघटनेची स्थापना केली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी अमृतपाल सिंगच्या खांद्यावर येऊन पडली. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी अमृतपाल सिंगला दुबईहून परतावं लागलं.
 
ॲक्टर-ॲक्टिविस्ट अशी ओळख असणारा दीप सिंग सिद्धू शेतकरी आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आला होता. पुढे रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाला.
 
मीडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये अमृतपाल सिंग सांगतो की,
 
अमृतसरच्या जादुखेडा गावात त्यांचं बालपण गेलं. 10 फेब्रुवारी 2023 मध्ये बाबा बकाला इथे त्याचा विवाह पार पडला.
 
गोपनीयतेचा मुद्दा पुढे करत त्याने आपल्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल काहीही सांगणं टाळलं. शिवाय माध्यमांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं टाळावं असंही पुढे सांगितलं.
 
अमृतपाल सिंहच्या म्हणण्यानुसार, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या शोधात त्याने अरबस्तान गाठलं.
आपला स्वभाव लोकांमध्ये मिसळण्याचा नसून मित्रमंडळी सुध्दा मर्यादित असल्याचं त्याने सांगितलं.
 
एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, दुबईतील मोठमोठ्या इमारती बघण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात. पण दुबईमध्ये राहत असताना देखील आपण या इमारती पाहायला कधी गेलोच नाही.
 
आपल्या शिक्षणाविषयी तो सांगतो की, शाळेत असताना त्याने त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्यानंतर तो दुबईला गेला.
 
तर दुसऱ्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये त्याने तीन वर्ष घालवली, पण आजही त्याला इंजिनिअरिंगची डिग्री मिळालेली नाही.
 
'हत्या घडवून आणल्या, शिवाय त्याच्या बोलण्यावरही प्रतिबंध लावला'
अमृतपाल सिंग सांगतो की, "एक तर त्यांनी आमच्या हत्या घडवून आणल्या, आणि त्याच हत्याकांडावरील चर्चेवर प्रतिबंध लावलाय. लोकांना असं वाटतं की, आम्ही स्वतः या गोष्टी करत नाही तर कोणीतरी आमच्याकडून हे करवून घेत आहे."
 
आपल्या विरोधकांबाबत बोलताना अमृतपाल सिंग सांगतो की, "त्यांचा तर विरोध सुरूच आहे. काही लोक म्हणायचे की, दीप सिद्धूचं प्रस्थ संपवू, पण आज त्यांच्याकडे उत्तरं नाहीत "
 
अमृतपाल सिंग सांगतो की, जुन्या संघटना नवीन लोकांना, विशेषतः स्वतंत्र विचारांना स्थान देत नाहीत.
अकाली दलाबद्दल अमृतपालचं मत काय?
अकाली दलाबाबत तो म्हणतो की, अकाली दल शीख पंथाशी संबंधित आहे आणि तो पंथात परत आला पाहिजे. शीख पंथ कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या अस्मितेवर अवलंबून नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.
 
अमृतपाल पुढे म्हणतो की, "ज्या लोकांनी देशात आपली प्रतिष्ठा गमावली त्यांनी सेवेच्या मार्गावर चालायला हवं. निदान त्यांनी त्यांच्या पापाची क्षमा मागितली पाहिजे."
 
तो पुढे सांगतो की, जर लोकांना असं वाटतं की, जग मूर्ख आहे आणि पंथाला यातलं काही समजत नाही तर आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे.
मीडियाशी बोलताना अमृतपाल पाल सांगतो की, "शिखांना सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो. शीख होमलॅन्ड मिळवण्याच्या मार्गतला सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्याच्या मागणीवर घातलेली बंदी. शीख स्वबळावर काही करू शकत नाहीत अशा खोट्या चर्चा सुरू असतात."
 
अमृतपाल आणि ओवेसींची तुलना..
अमृतपाल सिंह त्याच्या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर असतो. त्याच्या वक्तव्याबाबत आणि दुबईशी असलेल्या संबंधांबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतात.
 
त्याच्यावर टीका करणारे अनेकजण त्याची तुलना एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याशी करतात. लोक असं म्हणतात की, ओवेसी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या माध्यमातून ध्रुवीकरण करतात आणि त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळतो. अगदी त्याचपद्धतीने अमृतपाल सिंग अनेक वादग्रस्त वक्तव्यं करून पंजाबमध्ये ध्रुवीकरण करतोय आणि भाजपला त्याचा थेट फायदा होतोय.
ओवेसींशी तुलना करण्याच्या मुद्द्यावर अमृतपाल म्हणतो की ओवेसी त्यांच्या प्रत्येक कामात राजकारणाला अग्रस्थानी ठेवतात. त्यांच्यासाठी राजकारण सर्वस्व आहे. पण आम्हाला निवडणुकीच्या राजकारणात पडायचं नाही, आमचा धर्म आमच्यासाठी सर्वस्व आहे."
 
निवेदक बाबा बंता सिंग यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी भिंद्रनवालेचं उदाहरण देऊन म्हटलं होतं की, "आजकाल बरेच लोक हातात बाण घेऊन फालतूची बडबड करतात पण करत काहीच नाहीत."
 
नंतर ते असंही म्हणाले की, "अमृतपाल सिंगच्या नावावर आजवर कोणताच बट्टा लागलेला नाही. आणि भविष्यात कोणत्याही शिखाच्या नावावर बट्टा लागू नये."
 
लवप्रीत सिंग कोण आहे?
लवप्रीत सिंगचं पूर्ण नाव लवप्रीत सिंग तुफान असं आहे.
 
बीबीसीचे प्रतिनिधी गुरप्रीत सिंग चावला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवप्रीत सिंग शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहे.
 
लवप्रीत सिंग तुफानचे कुटुंबीय गुरसिख असून त्यांचे शीख संघटनांशी जुने नातेसंबंध आहेत.
 
लवप्रीत सिंगची आणि अमृतपाल सिंगची ओळख 'वारीस पंजाब दे' संघटनेच्या माध्यमातूनच झाली. सुरुवातीला तो संघटनेचा समर्थक होता, नंतर त्याला गुरुदास युनिटचं प्रभारीपद देण्यात आलं.
 
18 फेब्रुवारीला अजनाला आणि गुरुदासपूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लवप्रीतला तिबारी गावातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली.
 
त्याच्या अटकेच्या सहा दिवस आधी त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. लवप्रीतचे किसान लहर संघटनेशी सुध्दा संबंध आहेत.
 
Published By- Priya Dixit