1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:39 IST)

तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे.  अनिल देशमुख यांना अखेर रात्री १२.३० वाजता अटक दाखवण्यात आली. तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख  ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.
 
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलामार्फत कारण  पुढे करून ईडीकडून वेळ मागितला होता. मात्र देशमुख हे वेळ देऊन ही ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते. दरम्यान ईडीने एका पाठोपाठ एक असे चार महिन्यात पाच समन्स देशमुख यांना पाठवले होते. अखेर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यलयात सकाळी ११ वाजता दाखल झाले असता तब्बल १२ तास चौकशी नंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे
 
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे करीत होते, मात्र त्यांना बढती देऊन त्यांची केंद्रात बदली करण्यात आली होती. अनिल देशमुख हे चौकशीसाठी ईडी कार्यलायत हजर झाले असता सत्यव्रत कुमार यांना मुंबईत तात्काळ बोलवून घेण्यात आले होते. ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे सायंकाळी ७ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले असता अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने बरेच पुरावे गोळा केले असून या पुराव्याच्या आधारे रात्री उशिरा १२ वाजता अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.