सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (22:46 IST)

अण्णा हजारे यांनी दारूविक्रीच्या मुद्द्यावरून दिल्ली सरकारवर नाराजी व्यक्त केली

समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारूविक्रीच्या मुद्द्यावरून दिल्ली सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्लीतील दारूची दुकानं बंद करण्याची मागणी केली आहे.
 
देशात महागाई, बेरोजगारी वाढली असताना आणि भ्रष्टाचार संपुष्टात आलेला नसताना अण्णा शांत कसे, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता अण्णांनी थेट दिल्लीतील दारू विक्रीचा मुद्दा हाती घेतला असून केजरीवालांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी केजरीवाल यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे.
 
दिल्ली सरकारनं आणलेल्या नव्या मद्य धोरणामुळं दारू विक्रीला आणि तळीरामांना प्रोत्साहन मिळण्याची भीती आहे. गल्ली गल्लीत दारूची दुकानं सुरू होतील. यातून भ्रष्टाचार वाढेल. हे लोकांच्या हिताचं नाही. तरीही केजरीवाल सरकारनं हे धोरण आणलं. जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते, असं म्हणत अण्णा हजारेंनी केजरीवालांवर टीका केली आहे.
 
दिल्लीच्या नवीन मद्य धोरणात अनियमितता असल्याचा दिल्लीच्या मुख्य सचिवांचा अहवाल दिला होता. यानंतर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गेल्या महिन्यात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नोव्हेंबरमध्ये आणलेल्या धोरणांतर्गत दारू दुकानाचे परवाने खासगी व्यापाऱ्यांना देण्यात आले. या दारू धोरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.