मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (16:58 IST)

अशोक स्तंभ: बोधचिन्हातले सिंह उग्र आणि आक्रमक, सोशल मीडियावर टीका

नव्या संसदेच्या आवारातील कांस्य बोधचिन्हाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झालं. 6.5 मीटर (21 फूट) उंच अशा या बोधचिन्हात चार आशियाई सिंह आहेत. या बोधचिन्हाचं वजन साडेनऊ हजार किलो इतकं आहे.
 
इसवी सन पूर्व 250 काळातील अशोकाच्या स्तंभावरून घेण्यात आलेल्या या बोधचिन्हावरून वादाला तोंड फुटलं आहे.
 
बोधचिन्हातील सिंहाचा नवा अवतार हा उग्र आणि आक्रमक आहे आणि मूळ बोधचिन्हात बदल करण्यात आला आहे, अशी टीका होऊ लागली आहे. पंतप्रधान मोदींनी बोधचिन्हाच्या अनावरणाचा व्हीडिओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. नव्या संसद भवनात हे बोधचिन्ह विराजमान असणार आहे.
 
परंतु पंतप्रधान मोदींनी नव्या संसदेच्या आवारातील बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर सोशल मीडियावरून सिंहांच्या नव्या अवताराबाबत टीका केली आहे. सम्राट अशोकाच्या काळातील बोधचिन्हामधील सिंह हे शौर्याचं प्रतीक होतं. पण आता हे सिंह उग्ररुपातले असून ते रागाने गुरगुरत आहेत असं वाटतं.
 
अशोकाच्या काळातील सिंहांना नवं रूप देण्यात आलं असून, आता ते दात विचकणारे सिंह झाले आहेत असं एका नेटिझनने म्हटलं आहे.
 
मोदी सरकारने ब्रिटिशांच्या काळातील वास्तूंच्या नूतनीकरणाचा घाट घातला असून याअंतर्गत संसदेची नवी इमारत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 200 अब्ज रुपये एवढा असणार आहे.
विरोधी पक्षांनी या प्रकल्पाच्या खर्चासाठी तसंच याच्या प्रारुपाबद्दल मोदी सरकारवर टीका केली आहे.
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलं की "पंतप्रधान मोदी यांनी बोधचिन्हाचे अनावरण करणे ही घटनेची पायमल्ली आहे. कायदेमंडळ आणि कार्यकारिणी यांच्यात निर्णयांचं विभाजन होतं."
 
बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधान मोदींनी पूजा केली. हा हिंदू संस्कृतीतील परंपरेचा भाग आहे. यावरही येचुरी यांनी टीका केली आहे. बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं नाही, असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित ऑगस्ट 2022 पर्यंत नव्या संसदेचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण अधिकाऱ्यांनी या वास्तूचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असं स्पष्ट केलं.