भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सच्या गस्ती पथकावर हल्ला, १ जवान शहीद, ४ जखमी
अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात मंगळवारी सकाळी भारत-म्यानमार सीमेजवळ संशयित दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला आणि इतर चार जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नामपोंग सर्कल अंतर्गत नामपोंग नाला जवळ सकाळी ६:३० च्या सुमारास घडली. त्यावेळी, २१ व्या आसाम रायफल्सचे जवान भारत-म्यानमार सीमेवर ज्या भागात कुंपणाचे काम सुरू आहे, त्या भागात गस्त घालत होते.
गोळीबारात हवालदार जानखोकाई कुकी शहीद
प्राथमिक माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात ४२ वर्षीय हवालदार जानखोकाई कुकी शहीद झाले. गोळीबारात इतर चार जवानही जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
हल्ल्यानंतर सुरक्षा कारवाया तीव्र झाल्या
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरातील कारवाया तीव्र केल्या आहेत. प्राथमिक अहवालानुसार, यात एनएससीएन (के-वायए) शी संलग्न असलेल्या अतिरेक्यांचा संभाव्य सहभाग असल्याचे सूचित होते. तथापि, अधिकाऱ्यांनी अद्याप हल्लेखोरांच्या ओळखीची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
चांगलांग पोलिसांनाही या घटनेबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना भारत-म्यानमार सीमेवर घडल्याची माहिती असून, चांगलांग पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला (ओसी) माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले आहे.
चांगलांग सीमावर्ती भाग संवेदनशील मानला जातो
अरुणाचल प्रदेशातील चांगलांगांग जिल्हा भारत-म्यानमार सीमेला लागून आहे. सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या अतिरेकी गटांच्या कारवायांमुळे हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. सुरक्षा दल सध्या संपूर्ण परिसरात शोध आणि निगराणी मोहीम राबवत आहे.
Edited By- Dhanashri Naik
