शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (21:38 IST)

साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार

Assistant Commissioner of Police Jyotsna Rasam will investigate the Sakinaka rape case
मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार प्रकरणाचा तपास  सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम  करणार आहेत. तसंच, आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.  तसंच, आरोपी मोहन चौहान या नराधमाला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुननावली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
 
“साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू,” असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.
 
“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केलं जाईल,” असं हेमंत नगराले यांनी सांगितलं.
 
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो  आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.