शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (10:16 IST)

प्रजासत्ताक दिन ट्रॅक्टर रॅली : टिकरी बॉर्डरजवळ शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे. दिल्लीत सव्वा लाख ट्रॅक्टर या रॅलीसाठी येणार असल्याचा अंदाज आहे.
 
ट्रॅक्टर दिल्लीला येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार दिल्ली-हरियाणाजवळील टिकरी बॉर्डरपाशी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, टिकरी बॉर्डरहून निघालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली दिल्लीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या रॅलीसाठी 10 वाजताची वेळ होती, मात्र सर्व सीमांवरून शेतकरी नियोजित वेळेच्या आधीच निघाले आहेत.
 
दिल्लीला किती ट्रॅक्टर येणार आहेत?
शेतकरी नेते राजिंदर सिंह दीपसिंहवाला यांनी बीबीसी पंजाबीशी बोलताना म्हटलं की, ट्रॅक्टरची नेमकी संख्या सांगणं अवघड आहे, कारण शेतकरी संघटनांशी संबंधित नसलेले शेतकरीही मोठ्या संख्येनं दिल्लीला येत आहेत.
 
आपल्याला मिळालेलया माहितीनुसार अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर दोन रांगा करून येणाऱ्य ट्रॅक्टरची लाइन ही अंबालापासून लुधियानापर्यंत लागली होती, असा दावा शेतकरी नेते बलदेव सिंह सिरसा यांनी माध्यमांशी बोलताना केला.
 
भारतीय शेतकरी संघटना दोआबाचे महासचिव सतनाम सिंह साहनी यांनी म्हटलं की, 23 जानेवारीला फगवाडा सब- डिव्हिजनकडून 2500 ट्रॅक्टर पाठविण्यात आले आहेत. दोआबा जालंधर, होशियारपूर, कपूरथला आणि शहीद भगतसिंह नगर इथून आधीच दोन हजार ट्रॅक्टर निघाले आहेत.
 
बलजित सिंह संघा यांनी दिलेल्या माहितीनुसार काला संघिया शहरातून 25 ट्रॅक्टर रवाना झाले आहेत, जे किसान परेडमध्ये सहभागी होतील.
 
भारतीय किसान युनियन (एकता-उग्राहां) राज्य महासचिव सुखदेव सिंह कोकरी यांनी सांगितलं की, आम्ही शेतकऱ्यांना सकाळी 11 वाजता दिल्लीला जाण्यासाठी डबवाली आणि खनौरी इथं जमायला सांगितलं होतं, मात्र शेतकरी सकाळी आठ वाजताच दिल्लीसाठी रवाना झाले.
 
भारतीय किसान युनियन (एकता-उग्राहां)नं 30 हजार ट्रॅक्टर दिल्लीला पाठवले आहेत. 200 ते 300 ट्रॅक्टर्सचे छोटे-छोटे गटही पंजाबची सीमा ओलांडून दिल्लीकडे येत आहेत.
 
अखिल भारतीय किसान सभेचे नेते सुखजिंदर महेसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोगा, फरीदकोट, फिरोजपूर, फाजिल्का, श्री मुक्तसर साहिब, मानसा आणि बठिंडा जिल्ह्यातून 50-50 ट्रॅक्टरचे गट दिल्लीला रवाना झाले आहेत.
 
जालंधरमधील दोआबा किसान संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष हर्षिलंदर सिंह यांनी संघटनेनं 700 ट्रॅक्टर पाठवल्याचं म्हटलं आहे. 23 जानेवारीला 300 ट्रॅक्टर पाठवण्यात आले होते आणि उरलेले दोन दिवसांत पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.
 
हरियाणा पंजाब एकता मंचाचे अध्यक्ष सतीश राणा यांनी हरियाणातून दोन लाख ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होतील अशी माहिती बीबीसीशी बोलताना दिली. हे ट्रॅक्टर शिस्तीत दिल्लीत पोहोचावेत आणि शेतकऱ्यांच्या खाण्या-पिण्याची तसंच इतर खर्चांची योग्य सोय व्हावी यासाठी खाप पंचायती प्रयत्न करत असल्याचं राणा यांनी सांगितलं.
 
प्रत्येक संघटना स्वतःचे आकडे सांगत आहे आणि संघटनेच्या बाहेरचेही खूप लोक ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे नेमका आकडा सांगता येणं कठीण आहे.