1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (18:10 IST)

पती-पत्नीच्या भांडणामुळे बँकॉकला जाणारं विमान दिल्लीत उतरलं... नेमकं काय घडलं?

म्युनिकहून बँकॉकला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानाचे एका जोडप्याच्या भांडणामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
 
लुफ्थांसाचे फ्लाइट क्रमांक LH772 बुधवारी (29 नोव्हेंबर 2023) सकाळी 10.26 वाजता दिल्लीत उतरलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितलं की, केबिन क्रू (विमान कर्मचारी) ने फ्लाइटमधील प्रवाशांचे वागणे त्रासदायक असल्याचं आणि पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्याचं सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
“पती-पत्नीच्या भांडणाचे कारण माहीत नसले तरी त्यांच्या भांडणामुळे विमान दिल्लीकडे वळविण्यात आलं,” असं एएनआयने दिल्ली विमानतळ विमान वाहतूक सुरक्षेकडून मिळालेल्या माहितीच्या आधाराने म्हटलंय.
 
लुफ्थांसा एअरलाइनने एका निवेदनात म्हटलंय की बँकॉकला जाणाऱ्या विमानातून एका जर्मन प्रवाशाला दिल्लीत उतरल्यानंतर विमानाबाहेर काढण्यात आलं.
 
लुफ्थांसाने सांगितलं की, प्रवाशाने माफी मागितली आहे.
 
विमान कंपनीने सांगितलं की, प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
 
नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रवाशाच्या संदर्भात एअरलाइन जर्मन दूतावासाच्या संपर्कात आहे.
 
प्रवाशाला भारतातील तपास यंत्रणांकडे सोपवायचं की माफीचा विचार करून त्याला जर्मनीला परत पाठवायचं याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.
 
पाकिस्तानात उतरण्यात अयशस्वी, दिल्लीत उतरले
सुरुवातीला पाकिस्तानातील विमानतळावर उतरण्यासाठी परवानगी मागितली गेली होती, तरी तिथे विमान उतरवणे शक्य नव्हतं. त्यानंतर विमान दिल्लीत उतरवण्यात आले. गैरवर्तन करणाऱ्या पतीला विमानातून खाली उतरवून विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं.
 
विमानातील भांडणात सहभागी जोडप्यामध्ये पत्नी थायलंडची नागरिक तर पती जर्मन होता.
 
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पत्नीने प्रथम फ्लाइट क्रूकडे तिच्या पतीच्या वागणुकीबद्दल तक्रार केली, असं इंडियन एक्सप्रेसने म्हटलंय. तिने सांगितलं की तो तिला धमकावत आहे आणि कर्मचार्‍यांना त्याला शांत करण्यास सांगितलं.
 
"त्यांने अन्न फेकून दिलं आणि ब्लँकेटला लायटरने आग लावण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या पत्नीवर मोठ्याने ओरडला. "त्याने विमान कर्मचा-यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं नाही," असं पीटीआयने सांगितलं.
 
उड्डाणे कधी वळवली जातात?
जी उड्डाणे ठराविक वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचायची आहेत ती विविध कारणांमुळे वळवली जातात आणि इतर विमानतळांवर उतरवली जातात.
 
हवामानाची परिस्थिती प्रतिकूल असताना, विमानात यांत्रिक समस्या उद्भवल्यास, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा प्रवासी अयोग्य वर्तन करत असल्यास उड्डाणं वळवली जातात.
 
राष्ट्रीय आपत्ती आणि अचानक लष्करी संघर्ष उद्भवल्यासही उड्डाणं वळवली जातात.
 
विमान वळविल्यामुळे प्रवाशांवर प्रचंड ताण पडतो. त्यांच्या प्रवासाचे नियोजनही वेगवेगळे असतं.
 
अलिकडेच दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे एकाच दिवसात 16 उड्डाणं वळविण्यात आलेली होती. त्यापैकी 10 जयपूर, 3 लखनौ, 2 अमृतसर आणि एक अहमदाबादला वळविण्यात आलेले होतं.