रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (23:29 IST)

भारत विरूद्ध इंडिया : राष्ट्रपतींच्या एका निमंत्रण पत्रिकेवरून वाद, सोशल मीडियावर चर्चा

TWITTER@DPRADHANBJP
TWITTER@DPRADHANBJP
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला रात्री आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. जी-20 संमेलनाच्या संदर्भात पाठवलेल्या या निमंत्रण पत्रिकेत त्यांनी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केला.
 
केंद्र सरकार देशासाठी 'इंडिया' हा शब्द वापरणं बंद करून आता केवळ 'भारत' हाच शब्द वापरात आणण्याचा डाव आखत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
 
विरोधी पक्षांच्या या आरोपांवर केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टमुळे या वृत्ताला दुजोरा मिळताना दिसतोय.
 
यानंतर गिरीराज सिंह यांनीही त्यांची निमंत्रण पत्रिका एक्स (ट्विटर) वर शेअर केली आहे ज्यात 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केला आहे.
 
9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींकडून रात्रीच्या भोजनासाठी ज्या निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी देखील ही निमंत्रण पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. हा कार्यक्रम नव्याने बांधण्यात आलेल्या 'भारत मंडपम'मध्ये होणार असून निमंत्रण पत्रिकेवर नेहमीप्रमाणे 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' लिहिण्याऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असं लिहिण्यात आलेलं आहे.
 
धर्मेंद्र प्रधान यांनी या निमंत्रण पत्रिकेसोबत ‘जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. जय हो. #presidentOfBharat’ असा संदेशही लिहिला आहे.
 
ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे विरोधी पक्ष आरोप करतोय की भाजप 'इंडिया' युतीला घाबरत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतात की 'भारत' हे नाव वापरण्यात काहीच गैर नाही कारण हा संविधानाचा भाग आहे.
 
काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षाने म्हटलंय की, "राष्ट्रपतींनी जी-20 परिषदेसाठी पाहुण्यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेत रिपब्लिक ऑफ 'इंडिया' ऐवजी रिपब्लिक ऑफ 'भारत' या शब्दाचा उल्लेख केला आहे. 'इंडिया' या शब्दाची इतकी भीती? मोदी सरकार विरोधी पक्षांचा द्वेष करतंय की हे हुकूमशहा घाबरले आहेत?”
पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलं की, "म्हणजे ही बातमी अगदी खरी आहे तर. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-20 भोजन समारंभासाठी पाठवलेल्या निमंत्रणात नेहमी वापरल्या जाणार्‍या 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असं लिहिलं आहे. घटनेच्या कलम 1 मध्ये असं लिहिलंय की, इंडिया म्हणजेच भारत, राज्यांचा संघ आहे. पण आता या 'राज्यांच्या संघराज्यावर' हल्ला केला जातोय."
 
'भारत विरुद्ध इंडिया' वादावर भाजप नेते काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी (5 सप्टेंबर) भारत विरुद्ध इंडिया वादावर काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
 
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, "त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. मला त्यांना काहीही म्हणायचं नाही. मी भारतीय आहे. माझ्या देशाचं नाव ‘भारत’ आहे आणि नेहमी ‘भारत’च राहील. जर काँग्रेसला समस्या असेल तर त्यांनी त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा."
दुसरीकडे भाजप खासदार सुशील मोदी म्हणाले, "राज्यघटनेत भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द आहेत. जर 75 वर्षांपासून ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असं लिहिलं जात होतं आणि आता ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असं लिहिलं जात असेल तर काय अडचण आहे? आम्ही ‘इंडिया माता की जय’ म्हणत नाही. आम्ही ‘भारत माता की जय’ म्हणतो."
"एक लोकप्रिय गाणं देखील आहे, 'भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं.'
 
राम, कृष्ण आणि भरत यांच्या परंपरेनुसार भारत हे नाव पडलं आहे. तर इंडिया हे नाव परदेशी लोकांनी दिलं आहे. जर राजद आणि जेडीयूचे लोक भारताच्या नावाने चिडत असतील आणि त्यांना भारत हे नाव नसेल घ्यायचं तर ते इंडिया असं म्हणू शकतात."
 
काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया
भाजपच्या 'इंडिया शायनिंग' आणि 'डिजिटल इंडिया'ची आठवण करून देताना जयराम रमेश म्हणाले, "भाजपनेच 'इंडिया शायनिंग'ची घोषणा दिली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने विचारलं होतं की 'सामान्य माणसाला काय मिळालं?' भाजपनेच 'डिजिटल इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'न्यू इंडिया' आणि इतर गोष्टी आणल्या आणि ज्याच्या प्रत्युत्तरात काँग्रेसने 'भारत जोडो यात्रा' सुरू केली, त्याच्याच शुभारंभाचा पर्वा वर्धापन दिन आहे."
 
पवन खेरा यांनी म्हटलं , "मोदीजींना 'इंडिया' नावाचा त्रास होत आहे, आता ते त्याचं नाव बदलून 'भारत' ठेवत आहेत. आज संपूर्ण जग तुमच्यावर हसत आहे. तुम्ही आमचा आणि आमच्या विचारसरणीचा तिरस्कार करता, काही हरकत नाही. पण इंडियाचा द्वेष करू नका, भारतीयांचा द्वेष करू नका."
गौरव गोगोई म्हणाले, "आम्हाला 'भारत' आणि 'इंडिया' या दोन्ही नावांचा अभिमान वाटतो. इस्रो, आयआयटी, आयआयएम, आयपीएस. या सगळ्यात 'आय' म्हणजे इंडिया आहे. पण 'इंडिया' युतीमुळे भाजप इतकं घाबरलं आहे की ते अगदी काहीही वागू लागलेत."
 
इंडिया विरुद्ध भारत वादावर केजरीवाल म्हणाले...
जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रपतींनी दिलेल्या भोजन समारंभासाठी छापण्यात आलेल्या कथित निमंत्रण पत्रिकेवरून झालेल्या वादानंतर अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
 
एका पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले, "हा देश 140 कोटी लोकांचा आहे, देश कोणत्याही एका पक्षाचा नाही. समजा उद्या या 'इंडिया' युतीचं नाव बदलून भारत केलं तर ते (भाजप) भारताचं नाव पण बदलणार का? भारताचं नाव भाजप ठेवणार का?"
"ही काय चेष्टा आहे? आपला देश हजारो वर्ष जुना आहे, 'इंडिया' युती झाली म्हणून त्याचं नाव बदललं जातंय. असं केल्याने 'इंडिया' आघाडीची मतं कमी होतील, असं भाजपला वाटतंय. हा तर देशाचा विश्वासघात आहे."
 
वीरेंद्र सेहवागने BCCI आणि जय शाह यांच्याकडे केली मागणी
दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने बीसीसीआय आणि त्याचे सचिव जय शाह यांच्याकडे एक मागणी केली आहे.
 
पुढील महिन्यात भारतात सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर 'भारत' असं लिहावं असं वीरेंद्र सेहवागने म्हटलंय.
इंडिया विरुद्ध भारत' वादावर वीरेंद्र सेहवागने ट्वीट करत म्हटलंय की, "मला विश्वास आहे की नाव असं असावं की ज्यामुळे आपलं हृदय अभिमानाने भरून येईल. आपण भारतीय आहोत, इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिलं होतं आणि बऱ्याच काळापासून आपलं खरं नाव 'भारत' असं अधिकृत करणं प्रलंबित होतं. मी बीसीसीआय, जय शाह यांना विनंती करतो की या विश्वचषकात आपल्या खेळाडूंच्या जर्सीवर 'भारत' असं लिहावं."
 
भारताचं नाव बदलण्याची मागणी
संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात असं लिहिलंय की "इंडिया, म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे." भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी इंडिया हे नाव बदलून भारत असं करण्याची मागणी केली आहे.
 
अलीकडेच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार नरेश बन्सल यांनी राज्यसभेत म्हटलं होतं की, इंडिया हे नाव 'वसाहतवादी गुलामगिरी'चं प्रतीक आहे आणि ते घटनेतून काढून टाकलं पाहिजे.
 
गेल्या वर्षी जूनमध्ये या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. यात 'इंडिया' हे नाव बदलून 'भारत' करण्याची मागणी करण्यात आली होती.
 
या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं की, लोकांनी इंडिया ऐवजी भारत हे नाव वापरायला सुरुवात करावी.
 








Published By- Priya Dixit