शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (08:23 IST)

भाजप 'असा' साजरा करणार वर्षपूर्तीचा जल्लोष

लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील द्वितीय सरकारच्या वर्षपूर्तीचा देशभर ‘आभासी’ जल्लोश करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. प्रत्येक राज्यात किमान एक ‘व्हर्च्युअल’ सभा घेऊन व देशभरात किमान एक हजार ‘आॅनलाईन’ परिषदांचे आयोजन करून  या सरकारची  कामगिरी लोकांपुढे मांडणार आहे.

द्वितीय मोदी सरकारला येत्या शनिवारी या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. भाजपचे केंद्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रत्येक प्रदेश पक्षाला व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना ‘व्हर्च्युअल’ वर्षपूर्तीची रूपरेखा पाठविली आहे. त्यानुसार प्रदेश पक्षांनी प्रत्येक मोठ्या राज्यात किमान दोन व छोट्या राज्यांमध्ये किमान एक ‘व्हर्च्युअल’ सभा आयोजित करावी व अशा प्रत्येक सभेला किमान ७५० व्यक्तींची ‘आॅनलाईन’ उपस्थिती असावी, असे सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे, तिहेरी तलाकविरोधी कायदा, अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करणे, यासारख्या सरकारच्या ‘भरीव’ कामगिरीची माहिती या कार्यक्रमांमधून लोकांना दिली जाणार आहे. शिवाय कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोदींनी कणखरपणे निर्णय घेऊन जगापुढे कसा आदर्श निर्माण केला, याचेही माहिती देण्यात येईल.