बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 26 जुलै 2022 (15:35 IST)

बोटाद: गुजरातमध्ये विषारी दारू पिऊन31 जणांचा मृत्यू

liquor
गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिड गावात बनावट दारू पिऊन किमान 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनी गुजरातचे गृहसचिव राजकुमार यांनी सांगितले की या घटनेला गांभीर्याने घेण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. 40 जणांची प्रकृती अस्थिर आहे. या लोकांना भावनगर, बोटाद आणि अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे.
 
काही महिन्यांपूर्वीच दिली होती तक्रार
रोजिड गावचे सरपंच जिगर डुंगरानी यांनी या घटनेसाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरत निशाणा साधला आहे.
 
ते म्हणाले, "तीन चार महिन्यांपूर्वीच मी प्रशासन, एसपी, पीएसआय, तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर जर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. पण त्यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही."
या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळे पथक तैनात केले आहे आणि या इतर भागात बनावटी दारूची विक्री होत असेल तर हे तपासण्यासाठी सांगितले आहे.
 
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
 
ते म्हणाले, "गुजरातमध्ये दारूबंदी असून देखील दारू मिळते. सर्वांना माहीत आहे की हा पैसा कुठे जातो. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आले तर दारूबंदीचे कठोर पालन होईल."
 
'अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांचे आशीर्वाद'
काँग्रेस नेते अमित चावडा यांनी द हिंदूला सांगितले की "बनावट दारूचा व्यवसाय करणारे आणि पोलिसांची हातमिळवणी आहे. राज्यात अवैध दारू विकली जात आहे पण भाजप सरकार त्यांना आश्रय देत आहे. पोलीस त्यांच्याकडून हफ्ते घेत आहेत."
 
या प्रकरणात गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत गुजरात काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी म्हटलं आहे की, "गुजरातमध्ये गुजरात सरकारच्या आशीर्वादाने राज्यात कोट्यवधीची बनावट दारू विकली जात आहे. सरकार केवळ यावर सर्क्युलर काढण्यातच व्यग्र आहे."
या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
 
बीबीसी गुजरातीचे सहकारी पत्रकार सचिन पिथवा यांनी सांगितले की ही बनावट दारू बरवाला तालुक्यातील चोकडी गावात बनली होती. त्या ठिकाणी देखील पोलिसांनी तपासासाठी आपले पथक पाठवले आहे.