शाळांमधील नियमबाह्य दुकानदारी तत्काळ थांबवा : सीबीएसई
शाळांमध्ये पुस्तके, विद्यार्थ्यांचे गणवेश आणि शालेय साहित्याची विक्री करणे नियमबाह्य असून ही दुकानदारी तत्काळ थांबवा, अशी ताकीद केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सर्व संलग्नित शाळांना दिली आहे.
गणवेश, पुस्तके व अन्य शालेय साहित्य शाळेतच किंवा विशिष्ट विक्रेत्यांकडूनच घेण्याची सक्ती करून शाळा राजरोसपणे लूट करत असल्याच्या असंख्य तक्रारी सीबीएसईकडे पालकांनी केल्यानंतर त्या तक्रारींची गंभीर दखल घेत सीबीईएसने सर्व संलग्नित शाळांना ही ताकीद दिली आहे.
मंडळाने तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली आहे. पालकांना क्रमिक पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, गणवेश, बूट, स्कूल बॅग इत्यादी शाळेकडून किंवा ठरावीक विक्रेत्यांकडूनच घेण्याची पालकांना सक्ती करू नये. अशा नियमबाह्य व्यवहारापासून शाळांनी दूरच राहावे, असे निर्देश सर्व संलग्न शाळांना देण्यात येत आहेत, असे सीबीएसईने पत्रात म्हटले आहे.