गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (18:21 IST)

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, हरिश रावत यांची माहिती

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
 
पंजाब विधिमंडळात काँग्रेसचे नेते म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, असं रावत यांनी म्हटलं आहे.
 
"हा हायकमांडचा निर्णय आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. चन्नी हे माझ्या लहान बंधूसारखे आहेत. मी अजिबातच नाराज नाही", असं काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील उमेदवार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी म्हटलं आहे.
 
शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सुनील जाखड, सुखजिंदर सिंह रंधावा,नवज्योत सिंग सिद्धू, प्रताप सिंह बाजवा यांची नावं चर्चेत होती.
 
मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.पंजाबमध्ये सहा महिन्यांमध्ये निवडणुका आहेत त्यामुळे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
 
सिद्धू यांनी अमरिंदर यांच्याविरोधातील आमदारांचं नेतृत्व केलं होतं. अमरिंदर यांच्या कामकाजावर सिद्धू यांनी जाहीर टीका केली होती. सिद्धू यांच्याबरोबर अनेक आमदार असल्याने काँग्रेस पक्षाने अमरिंदर यांना पदावरून दूर केलं. मात्र नव्या रचनेत मुख्यमंत्रीपद सिद्धू यांच्याऐवजी चन्नी यांना देण्यात आलं आहे.
 
चन्नी यांच्या नियुक्तीसह पंजाबला पहिल्यांदाच दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री लाभणार आहे.