रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (14:56 IST)

आता कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादीत्य सिंधीया भाजपमध्ये प्रवेश करणार ?

मध्यप्रदेशच्या राजकारणात मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता
 
कर्नाटकनंतर आता मध्य प्रदेशच्या कॉंग्रेसमध्ये मोठ्या संघर्षाची ठिगणी पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मध्यप्रदेशच्या कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ हे आज कॉंग्र्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत पण कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादीत्य सिंधीया यांनीदेखील या पदावर आपला दावा केला आहे त्यामुळे येत्या काळात त्यांना हे पद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, अजूनही कमलनाथच या पदाचे काम पाहत असल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. या पदासाठी ज्योतिरादित्य सिंधीया इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसमोर सिंधीया यांनी या पदासाठी आपला दावा सांगितला असल्याचे सांगण्यात येत आहे,. तसेच जर सिंधीया यांना हे पद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे.