मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (16:28 IST)

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली, राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती बिघडली आहे. राजीव सातव यांची तब्येत खालावल्याचं कळताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. 
 
कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
मुंबईहून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला पुण्याला बोलवण्याबाबत हालचाली सुरु आहेत. राज्यमंत्री विश्वजित कदम सध्या सातव यांच्यासोबत आहेत. राजीव सातव यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात यापुढचे उपचार होतील असं सांगितलं जात आहे.
 
दरम्यान, राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. त्याचसोबत ते हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटे असतानाही ते निवडून आले होते. राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली.