काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून काही वेळात याचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल, यावर थोड्यात वेळात शिक्कामोर्तब होईल.
				  													
						
																							
									  
	 
	काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात होत आहे. परवा (17 ऑक्टोबर) या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
				  				  
	 
	सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	त्यानंतर आज एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गांधी परिवारातील कोणताही सदस्य सहभागी झाला नाही.
				  																								
											
									  
	 
	त्यामुळे, 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच बिगर-गांधी कुटुंबातील सदस्य काँग्रेसचा अध्यक्ष बनणार असल्याने ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे.
				  																	
									  
	 
	मतदान प्रक्रिया पूर्ण
	काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया 17 ऑक्टोबर रोजी पार पडली. या निवडणुकीत 96 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या 9,900 प्रतिनिधींपैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत 100 टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास 90 टक्के मतदान झाले होते.
				  																	
									  
	 
	देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली.
				  																	
									  
	 
	9800 मतदार शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी एकाची निवड करतील. या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे 40 मतदार मतदान करणार आहेत, असं सांगण्यात आलं होतं.
				  																	
									  
	 
	पक्षाच्या मुख्यालयात 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल 22 वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल 24 वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.
				  																	
									  
	 
	मतदारांनी मतदानपत्रिकेवरील उमेदवाराच्या नावापुढे मतदान करताना एक क्रमांक टाकावा, असे आधी ठरले होते. मात्र, या मतदानपत्रिकेवरील अनुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर मल्लिकार्जुन खर्गे व दुसऱ्या क्रमांकावर शशी थरूर यांचे नाव आहे. जर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे क्रमांक टाकून मतदान केल्यास गोंधळात भर पडेल व दोन क्रमांकावरील थरूर यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता थरूर गटाने व्यक्त केली होती.
				  																	
									  
	 
	काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी, असे आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने केले आहे. पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी हा निर्णय जाहीर केला.
				  																	
									  
	 
	अशोक गेहलोत रिंगणाबाहेर...
	काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा असल्याचं चित्र सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत होतं.
				  																	
									  
	 
	त्यानंतर पुढचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून गेहलोत यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. मात्र गेहलोतांचा जीव मुख्यमंत्रीपदात अडकल्याचं दिसून आलं.
				  																	
									  
	 
	गेहलोत अध्यक्ष झाले तर सचिन पायलट हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होतील असा अंदाज बांधला जाऊ लागला.
				  																	
									  
	 
	मात्र पायलट यांच्या नावाच्या चर्चेने सगळं राजकारणचं ढवळून निघालं. त्यांच्या नावाला प्रचंड विरोध सुरू झालाय.
				  																	
									  
	 
	गेहलोत यांच्या समर्थकांनी सचिन पायलट यांच्या नावाला उघडपणे विरोध केला. गेहलोत यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे सादर केले.
				  																	
									  
	 
	शेवटी राजस्थानातील आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर गेहलोत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेऊन या निवडणुकीतून माघार घेतली.
				  																	
									  
	 
	राजस्थानातील आमदारांच्या बंडाची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत त्यांनी सोनिया गांधींची माफी देखील मागितली.
				  																	
									  
	 
	दिग्विजय सिंह यांनी घेतली माघार...
	दरम्यान अध्यक्षपदासाठी होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
				  																	
									  
	 
	खर्गे यांचं नाव जाहीर होताच अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत असणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.
				  																	
									  
	
	दिग्विजय सिंह यांनी यावेळी माध्यामांशी बोलताना सांगितलं की, "खर्गे हे माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि त्यांना सांगितले की त्यांनी जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. ते म्हणाले होते की ते अर्ज दाखल करणार नाहीयेत. नंतर माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर मला समजलं की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत."दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, "मी त्यांना सांगितलं आहे की ते माझे वरिष्ठ आहेत. मी त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही."