1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (17:29 IST)

12 ते 17 वर्षं वयोगटातील मुलांना कोरोना लस ऑक्टोबरपासून, NTAGI ची परवानगी

देशातील 12 ते 17 वर्षं वयोगटातील लहान मुलांना कोरोनाविरोधी लस ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायसरी ग्रूपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के.अरोरा यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिलीये.
 
गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने Zydus Cadila च्या, ZyCoV-D या कोरोनाविरोधी लशीच्या भारतात आपात्कालीन वापराची परवानगी दिली होती.
 
भारतात जानेवारी महिन्यापासून कोव्हिडविरोधी लसीकरणास सुरूवात झालीये. मात्र, उपलब्ध असलेल्या लशी 18 वर्षावरील लोकांसाठी आहेत. Zydus Cadila ची ZyCoV-D ही पहिलीच लस आहे जी 12 ते 17 वर्षं वयोगटातसुद्धा दिली जाऊ शकते.
 
Zydus Cadila च्या ZyCoV-D या कोरोनाविरोधी लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी गेल्या आठवड्यात आपात्कालीन वापराची परवानगी दिली होती. औषध निर्मिती करणारी कंपनी Zydus Cadila ने ऑक्टोबर महिन्यापासून लस भारतात उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती.
 
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत बोलताना नॅशनल टेक्निकल अॅडव्हायसरी ग्रूपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, "12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना ही लस ऑक्टोबरपासून उपलब्ध होण्यास सुरू होईल. त्याचसोबत प्रौढ व्यक्तीदेखील ही लस घेऊ शकतात."
 
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात 12 ते 17 वर्षं वयोगटातील मुलांची संख्या 12 कोटींच्या आसपास आहे. डॉ. अरोरा पुढे म्हणतात, "मुलांना ही लस उपलब्ध करून देण्याआधी, जी मुलं आजारी आहेत. ज्या मुलांना सहव्याधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लिस्ट आणि प्लान बनवण्याची तयारी सुरू आहे."
 
भारतात 1 टक्क्याच्या आसपास लहान मुलं सहव्याधी किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मिळतेय. "पण, सहव्याधी नसलेल्या निरोगी मुलांना प्रौढांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लस देण्यात येईल," असं डॉ. अरोरा ANI शी बोलताना म्हणाले.
 
तर, एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, डॉ. अरोरा पुढे म्हणाले, "12 ते 17 वर्षं वयोगटातील मुलांना कोरोनामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, 18-45 वयोगटातील पालकांना गंभीर आजार होण्याचा धोका 10-15 टक्के आहे. त्यामुळे, मुलांचं लसीकरण करण्याआधी प्राथमिकता या लोकांच्या लसीकरणाची आहे."
 
गेली दिड वर्षं शाळा बंद आहेत. मुलं घरी असल्याने त्यांच्यात एकटेपणा वाढतोय. मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलंय. स्मार्टफोन नसल्याने मुलं शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनीदेखील शाळा कशा पद्धतीने सुरू करता येतील यावर विचार करण्याची सूचना केली होती.
 
त्यावर डॉ. अरोरा ANI शी बोलताना सांगतात, "शाळा टप्या-टप्याने सुरू करण्याची आता वेळ आलीये. पण, त्याआधी प्रौढ व्यक्ती, पालक किंवा कुटुंबातील इतरांचं लसीकरण होणं गरजेचं आहे."कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
 
"शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस ड्रायव्हर अशा व्यक्ती ज्या मुलांच्या संपर्कात येतात. त्यांचं लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांच्या भोवती सुरक्षाकवच निर्माण केलं पाहिजे," ते पुढे सांगतात.