1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (09:02 IST)

लसीकरणाचा विक्रम : 80 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 8 वाजेपर्यंत 80,96,417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. काल देशात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आजपासून देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कालच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 
 
आतापर्यंत 28 कोटी नागरिकांचं लसीकरण
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 28 कोटी 33 लाख13 हजार 942 लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 5 कोटी 5 लाख 69 हजार हजार 129 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
 
विक्रमी लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकार आजपासून प्रत्येक भारतीयांसाठी’ मोफत लसीकरण मोहीम ‘सुरू करीत आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेच्या या टप्प्यातील सर्वाधिक लाभार्थी देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुण असतील. आपण सर्वांनी स्वतःला लस घेण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण देशातील नागरिक एकत्र येऊन कोरोनाचा पराभव करु, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 
 
7 जून रोजी मोफत लसीकरणाची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती 25 टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल. 21 जून पासून लोकांना मोफत लस देण्यात येईल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. लसनिर्मिती कंपण्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 75 टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन राज्य सरकारांना मोफत देणार आहे.
 
भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील, त्यांना खासगी रुग्णालयातून लस घेता येईल. लसनिर्मिती कंपन्या 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना विकतील. लसीच्या एकूण किमतीच्या 150 रुपये जास्त सर्व्हिस चार्ज घेऊन खासगी लस घेऊ शकतील. केंद्र सरकारनं खासगी रुग्णालयांसाठी लसीकरणाच्या किमती जाहीर केल्या आहेत.