शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (23:00 IST)

डीआरडीओ : डॉ. प्रदीप कुरुलकर, झारा दासगुप्ता आणि ‘बेब’ला दिलेली देशाची गुपितं

डीआरडीओ संशोधन आणि विकास विभागाचे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना 4 मे 2023 रोजी अटक झाली होती. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या हस्तकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील शासकीय गुपिते पुरवल्याच्या आरोपाखाली दशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली होती.
 
डॉ. प्रदीप कुरुलकरांचा झारा दासगुप्ता असं नाव वापरणाऱ्या हस्तकाशी संवाद सुरु होता असं तपासातून पुढे आलं आहे.
 
या दोघांच्या चॅटिंगमधून अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. कुरुलकर यांनी डीआरडीओच्या आर ऍन्ड डीमध्ये विकसित प्रकल्पांची माहिती झारा दासगुप्ता हिला वेळोवेळी पुरवल्याचं दोघांच्या चॅटमधून समोर येत आहे.
 
कुरुलकर यांच्या विरोधात शासकीय गुपीतं अधिनियमान्वये दोषारोप करण्यात आले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात 1837 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलंय.
 
प्रकरण काय?
डीआरडीओची तक्रार दहशतवाद विरोधी पथकाला प्राप्त झाल्यावर कुरुलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
पुणे युनिटमधल्या दहशतवाद विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं होतं की,
 
"प्राथमिक तपासणीत ही हनीट्रॅपची केस असल्याची शक्यता पुढे आली होती."
 
“प्रथमदर्शनी हा हनीट्रॅपचा प्रकार वाटतो आहे. पीआयओने महिलांचे काही सोशल मीडिया प्रोफाईल तयार केले आहेत. डिफेन्स किंवा सिक्यूरिटी संदर्भात काम करणाऱ्यांचे काही प्रोफाईल असतील तर ते काय करतात की हळूच त्यांना रिक्वेस्ट पाठवतात. त्यांच्या अकाउंटवर सुंदर मुलींचा फोटो असतो. महिलांच्या आवाजात बोलतात.
 
ते काही वेळेस पुढे पण जातात आणि व्हीडिओवर काही गोष्टी पण करतात. (ही त्यांची मोडस आपरेंडी असते.) हे इथे झालंय की नाही हा तपासाचा मुद्दा आहे. पण त्यांचं एवढं चॅट आहे तर नक्की काही ना काही त्या अनुषंगाने असणार. त्यातून हे पुढे झालेलं दिसतंय."
 
"असे प्रकार इंटरनेटवर नेहमी सुरु असतात. कधी कधी मोठा मासा गळाला लागतो. सामान्य लोकांसोबत सेक्स्टाॅर्शन होतं. हा वेगळा प्रकार आहे,” अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याने दिली.
 
कुरुलकर यांच्यासंदर्भात प्रामुख्याने व्हॅट्सएपवर चॅट दिसून आले होते.
 
याच चॅटिंगदरम्यान कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला क्षेपणास्त्रांच्या संदर्भात गोपनीय माहिती पुरवल्याचं तपासातून पुढे आलं आहे.
 
डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवर प्रदीप कुरुलकर काही महिलांना भेटायचे असा दावाही दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात आलाय.
 
कुरुलकर आणि झारा दासगुप्ताचं चॅटिंग
दिव्य मराठीने दिलेल्या बातमीनुसार कुरुलकर आणि झारा दासगुप्ता यांचं चॅटींग दहशतवाद विरोधी पथकाने दोषारोपपत्रासोबत जोडलेलं आहे. या चॅटींगमधून कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला कशाप्रकारे माहिती दिली हे समोर येतं.
 
लाँचरच्या डिझाईन त्यांनीच कसं तयार केलंय यापासून ते डीआरडीओ कँपसमधल्या गोष्टी तिला कशा सांगितल्या जायच्या हे त्या चॅटींगमध्ये असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. कुरुलकर झारा दासगुप्ताला बेब म्हणायचे असंही त्यात नमुद आहे.
 
ब्राम्होस, अग्नी-6 ते ड्रोन प्रोजेक्टची माहिती
कुरुलकर यांनी झारा दासगुप्ताला महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांविषयी माहिती दिली. यामध्ये ब्राम्होस, अग्नी-6, रुस्तम प्रोजेक्ट, सरफेस टू एअर मिसाईल, अनमॅन्ड काँबॅट एअर व्हेइकल, ड्रोन प्रोजेक्ट यांचा समावेश असल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत म्हटलेलं आहे.
 
यातील लाँचरचं डीझाईन कुरुलकरांनीच कसं बनवलं आहे, याविषयी त्यांनी झारा दासगुप्तासमोर बढाया मारल्याचंही यामधून समोर आल्याचं त्यात म्हटलेलं आहे.
 
एवढंच नाही तर ‘मिटीओर’ पेक्षा ‘अस्त्र’ मिसाईल कशी अचूक आहे हे सुद्धा त्यांनी नमुद केलेलं आहे.
 
आपण अत्यंत गोपनीय माहिती ही उघड करतोय, याची कल्पना असूनही कुरुलकरांनी ही माहिती शेअर केल्याचं दोषारोपपत्रात म्हटलेलं आहे.
 
गोपनीय माहितीचे दस्तावेज कुरुलकरांनी आपल्या फोनमध्ये सेव्ह केले होते, जे मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, असाही दावा दोषारोपपत्रात केला आहे.
 
व्हीडिओ चॅटसाठी झारा दासगुप्ताने कुरुलकरांना आणखी काही ऍप्स डाउनलोड करायला सांगितलं, असंही समोर आल्याचं त्यात नमुद करण्यात आलं आहे.
 
नंबर ब्लॉक केला आणि मग...
काही महिन्यांनंतर कुरुलकरांनी झारा दासगुप्ता हिचा नंबर ब्लॉक केल्याचं समोर आलं. तेव्हा त्या हस्तकाने एका वेगळ्या नंबरवरुन ‘Why you blocked me’ असा मेसेज कुरुलकरांना पाठवला.
या नंबरवरुन एटीएस वायुदलातील एका कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचलं. पीओआयचा जो हस्तक झारा दासगुप्ता नावाने कुरुलकरांशी चॅट करत होती त्याच आयपी एड्रेसवरुन या वायुदलातील कर्मचाऱ्यासोबतही चॅट सुरू असल्याचं समोर आलं. वायुदलातील कर्मचाऱ्याचा जबाब एटीएसने नोंदवून घेतला होता.
 
बीबीसी मराठी सोबत बोलताना कुरुलकर यांचे वकील ऍडव्होकेट ऋषिकेश गानू यांनी सांगितलं की, दहशतवाद विरोधी पथकाने दाखल केलेलं दोषारोपपत्र त्यांनी ताब्यात घेतलं आहे.
 
“7 जुलै रोजी आमच्या हातात ही चार्जशीट आली आहे. हजार पानांच्या वर ही कागदपत्रं आहेत. यासंदर्भात माझ्या क्लाएंटसोबत चर्चा करून पुढचं ठरवलं जाईल,” असं गानू यांनी सांगितलं.
 
प्रदीप कुरुलकर कोण आहेत?
प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओ मधील एक नामवंत शास्त्रज्ञ मानले जातात. कुरुलकर यांचा जन्म 1963 साली झाला. त्यांनी सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री (बीई) पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये ते सीव्हीआरडीई, अवडी येथे डीआरडीओमध्ये रुजू झाले.
 
पुढे त्यांनी आयआयटी कानपूरमधून पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधील प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केले. क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी उपकरणं, प्रगत रोबोटिक्स आणि लष्करी वापरासाठीचे मोबाइल मानवरहित प्रणालीचे डिझाइन यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे.
 
कुरुलकर यांनी डीआरडीओमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केलं आहे. डीआरडीओच्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण आणि ग्राउंड सिस्टीम्सच्या निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे.
 
डीआरडीओच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र मिशन शक्तीच्या प्रक्षेपकाची निर्मिती कुरुलकर यांच्या नेतृत्वात झाली होती.
 
कुरुलकर यांना 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी सायन्स डे पुरस्कार, 2002 मध्ये उत्कृष्टतेसाठी डीआरडीओ अग्नि पुरस्कार, आकाश प्रोजेक्टसाठी 2008 मध्ये पथदर्शी संशोधन आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओ पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.
 
कुरुलकर हे पुढच्या काही महिन्यांमध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच हा सगळा घटनाक्रम समोर आला आहे.
 
 
 
Published By- Priya Dixit