Spicejet Emergency Landing: कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, एकाच दिवसात दोन विमानं अपघातातून बचावली
Spicejet Emergency Landing : स्पाइसजेट एअरलाईनसाठी कठीण काळ सुरूच आहे. कंपनीच्या दिल्ली-दुबई विमानाचे आज सकाळी पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आता बातमी आली आहे की स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे आज कांडला-मुंबई दरम्यान आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. सामान्यपेक्षा जास्त दाबामुळे विमानाच्या बाहेरील खिडकीला तडा गेल्याचे वृत्त आहे. मात्र, वैमानिकांनी त्याचे सुरक्षित लँडिंग केले.
या लँडिंगवर, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “5 जुलै 2022 रोजी, स्पाइसजेट Q400 विमान SG 3324 (कांडला-मुंबई) चालवत होते, त्यादरम्यान FL230 येथे P2 बाजूच्या विंडशील्डच्या बाह्य पॅनमध्ये क्रॅक झाला. विमान मुंबईत सुरक्षित उतरले आहे. गेल्या 17 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानाची ही सातवी घटना आहे. डीजीसीए या घटनेची चौकशी करत आहे.
मंगळवारी सकाळी स्पाइसजेटच्या एसजी-11 फ्लाइटने दिल्लीहून दुबईला उड्डाण केले, वाटेत तांत्रिक अडचण आल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानात दीडशेहून अधिक प्रवासी होते. चांगली बाब म्हणजे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्पाईसजेट बी737 विमान दिल्लीहून दुबईला जात होते. इंडिकेटर लाइटमध्ये बिघाड झाल्याने विमान कराची विमानतळाकडे वळवण्यात आले.
विमान कराचीत सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. स्पाइसजेटकडून सांगण्यात आले आहे की कोणतीही आणीबाणी जाहीर करण्यात आली नव्हती आणि विमानाने सामान्य लँडिंग केले.