1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (21:18 IST)

स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनीही 'या' गावातल्या 14 मुलींना कॉलेजला जाण्यासाठी करावा लागला संघर्ष

rohit lohiya
हरियाणातल्या या चार ग्रामपंचायतींमधल्या चार गावातली मुलं कॉलेजला जातात. पण स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतरही मुलींच्या कॉलेजला जाण्यात अडथळा होता. गावातल्या मुलींनी पारंपरिक विचारसरणीला छेद देत कसं गाठलं कॉलेज?
 
जेव्हा नैनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने वडिलांना असं करारी उत्तर दिलं असेल असं वाटलंच नाही. पण तिची जिद्द होती- कॉलेजला जाण्याची.
 
नैनाने सांगितलं की, "वडील मला कॉलेजला पाठवायला तयारच नव्हते. मी अडून राहिले. मला शिकायचंच होतं. मी काही चुकीचं केलं तर तुम्ही माझी मान कापा".
 
कॉलेजला जाण्याचं स्वप्न पाहणारी ती एकमेव मुलगी नाही हे तिला माहिती होतं. पण आपण पहिली मुलगी आहोत जिने हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी निग्रह केला आहे हे तिला ठाऊक होतं.
 
हा रस्ता स्वत:साठी आणि 10 बहिणींसाठीच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या असंख्य मुलींसाठी खुला होणार होता.
 
दिल्लीपासून 100 किलोमीटरवरच्या हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातील देवीपूर ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही मुलींना कॉलेजात जाता येत नाही.
 
कुटुंब, गाव आणि सरकारी यंत्रणा यांच्याशी संघर्ष करत या मुलींनी कॉलेजला जाण्याचा हक्क कसा मिळवला?
 
ही आहे नैना आणि पंचायत परिसरातल्या 14 मुलींच्या जिद्दीची कहाणी.
स्वातंत्र्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल
गावातल्या बाकी मुलींप्रमाणे नैनानेही शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजला जाणं म्हणजे अधिक स्वातंत्र्य जे घरच्यांना मान्य नाही. हे स्वातंत्र्य अनेक अटींनंतरच मिळू शकतं.
 
नैना सांगते, "मला सांगण्यात आलं होतं की फार कुणाशी काही बोलायचं नाही. फोनचा वापर जराही करायचा नाही. घरुन कॉलेजला जायचं आणि तिथून थेट घरी यायचं".
 
कॉलेजला मुलींना न पाठवण्यासाठी गावकऱ्यांकडे ठोस कारण होतं.
 
देवापूरहून कॉलेजला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचं साधन नव्हतं. गावातून कॉलेजला जाण्यासाठीच्या रस्त्यावर एक पूल होता. तो पार करणं एक आव्हान आहे.
 
पूल पार करणं एक आव्हान
गावातली ज्येष्ठ मंडळी सांगतात, "बस सेवा नसल्याने माणसं घरातल्या मुलींना कॉलेजला पाठवणं टाळतात. वाहतुकीचं साधन मिळवण्याकरता त्यांना चार किलोमीटर चालावं लागतं.
 
मुलीही घाबरतात. पुलावर मुलं त्रास देतात".
 
पुलावर मुलींबरोबर काही ना काही वाईट प्रसंग घडतो. कधी त्यांच्या अंगावर चिखलफेक केली जाते तर कधी मुलं वीट फेकून मारतात. शेरेबाजी-टोमणे तर रोजचंच.
 
मुलांना घराबाहेर-गावाबाहेर जायला काहीही प्रतिबंध नाही. मुलं कुठेही जाऊ येऊ शकतात.
 
नैनाचे काका ज्यांना दोन मुलं आहेत. ते सांगतात, "मी देवाकडे प्रार्थना करतो की माझ्या भावालाही मुलगा झाला तर बरोबरी होईल".
 
ते एक पत्र...
नैनाची कॉलेजला जाण्याची जिद्द पाहून काही मुलींनी निर्धार केला आणि ठरवलं. जर गावापर्यंत बस आली तर या प्रश्नावर मार्ग निघू शकेल.
 
मुलींनी एकत्र येत गावकऱ्यांबरोबर एक बैठक घेतली आणि आपलं म्हणणं मांडलं.
या मुलींनी करनालच्या चीफ ज्युडिशियल जसबीर कौर यांना गेल्या वर्षी मे महिन्यात पत्र लिहिलं.
 
सीजीएम जसबीर कौर यांना पत्राने धक्काच बसला. इतक्या वर्षानंतरही मुली कॉलेजात जाऊ शकत नाही हे कळल्याने त्यांना आश्चर्य वाटलं.
 
जेंडर प्रश्नांवर काम करणाऱ्या ब्रेकथ्रू संस्थेच्या माध्यमातून मुली कौर यांच्यापर्यंत पोहोचल्या. कौर यांनी दुसऱ्याच दिवशी गावापर्यंत बससेवा सुरु करण्याचे आदेश दिले.
 
'मुलींना नशापाणी करताना पाहिलं आहे?'
सीजीएम यांनी देवीपूर गावाला भेट दिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बससेवा नसण्याच्या बरोबरीने गावातल्या लोकांची मानसिकता हाही एक प्रश्न आहे.
 
त्यांनी गावकऱ्यांना विचारलं की, "घराबाहेर नशा करणाऱ्या किती मुलींना पाहिलं आहे? गावकऱ्यांनी नाही असं सांगितलं. मी विचारलं की किती मुली शाळेतून पळून गेल्या आहेत? गाववाल्यांनी नाही सांगितलं.
 
तेव्हा मी गावकऱ्यांना सांगितलं की मग कॉलेजला जाऊन मुली बिघडतील असं का वाटतं तुम्हाला? गावकऱ्यांनी माझं ऐकलं आणि मुलींना बसच्या माध्यमातून कॉलेजला पाठवण्यासाठी ते तयार झाले".
 
पुलावर होणाऱ्या अनुचित घटना रोखण्यासाठी आणि मुलींची सुरक्षा निश्चित करण्यासाठी पीसीआरची व्यवस्था करण्यात आली. दिवसातून दोनदा पूल परिसरावर निगराणी ठेवण्यात येते.
 
नैनाच्या संघर्षात ज्योतीची भूमिका
बससेवा सुरू झाल्यानंतर नैनाच्या बरोबरीने देवीपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या चार गावातल्या 15 मुली कॉलेजला जाऊ लागल्या आहेत.
 
या मुलींच्या कॉलेजला जाण्यात ज्योती यांची भूमिका मोलाची आहे. करनाल जिल्ह्यातील गढी खजूर गावातील ज्योती दलित समाजाच्या आहेत.
त्यांनी सांगितलं, "बारावीनंतर मी कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांनी साथ दिली. पण बारावीनंतर शहरात जाऊन कॉलेजला जाणारी मी एकमेव मुलगी होते. माझ्या वयाच्या मुलींचं लग्न लावून दिलं जातं".
 
ग्रॅज्युएशनच्या वेळी ज्योतीच्या डोक्यात हेच घोळत होतं. मुलींना बारावीनंतर कॉलेजला का जाऊ दिलं जात नाही?
 
कॉलेजच्या शिक्षणादरम्यान ज्योती एका बिगरसरकारी संघटना 'वनिता फाऊंडेशन'शी संलग्न होत्या. त्यांनी गावातल्या वंचितांसाठी 'हरिजन चौपाल लर्निंग सेंटर' सुरू केलं.
 
'आता ही मॅडम होऊन आमच्या मुलींना शिकवेल'
कथित सवर्ण जातीच्या पुरुषांसाठी दलित समाजाची मुलगी मॅडम होऊन त्यांच्या मुलींना शिकवत आहे.
 
ज्योती सांगतात, "राजपूत समाजाची माणसं मला उद्देशून शेरेबाजी करतात. संध्याकाळी सेंटरला दारु पिऊन येतात आणि वाट्टेल तसं वागतात. तू कोण आहेस शिकवणारी असा प्रश्न विचारतात. म्हणूनच लर्निंग सेंटर मी गावातल्या सरकारी शाळेत हलवलं. हरिजन चौपालचं आव्हान राहू नये. आमचं काम थांबू नये".
 
'ब्रेकथ्रू' संघटनेच्या माध्यमातून ज्योती करनाल जिल्ह्यातील आठ गावात मुलींना उच्च शिक्षण मिळावं यासाठी काम करत आहेत. गढी खजूर गावच्याच शन्नो देवी यांनी कॉलेज दूर शाळेचं देखील शिक्षण घेतलेलं नाही. पण त्यांची नात सलोनी ज्योती यांच्या मदतीने बीएचं शिक्षण घेत आहेत.
 
नातीने जिंकलेली ट्रॉफी न्याहाळत शन्नो सांगतात, "ही शिकली तर पुढची पिढीही शिकेल. जिथे हिचं लग्न होईल तिथेही सकारात्मक बदल घडेल. स्वत:च्या पायावर उभं राहील. कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही".
 
बससेवा सुरू होणं प्रश्नावरचं उत्तर नाही
देवीपूरचे ज्येष्ठ नागरिक सांगतात, "बस सुरु झाल्यामुळे मुली कॉलेजला जाऊ लागल्या आहेत. पण मुलींनी अंधार पडायच्या आत घरी यावं असं त्यांना वाटतं.
 
गावापर्यंत एक बस येते. तिची परतण्याची वेळ संध्याकाळी 6 वाजता आहे. लवकर घरी पोहोचण्यासाठी मुलींना दरदिवशी काही वर्ग सोडून यावं लागतं".
 
देवीपूर ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्ण कुमार सांगतात, "बसच्या वेळेबाबत आम्ही प्रशासनाशी चर्चा केली आहे. पण यावर अद्याप मार्ग निघू शकलेला नाही.
 
जास्तीतजास्त मुली कॉलेजला जाव्यात, यशस्वी व्हाव्यात असं आम्हाला वाटतं. देवीपूरमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण देणारी शाळा झाली आहे लोक मुलींना शिकायला पाठवू लागले आहेत. पूर्वी आमच्या इथे दहावीपर्यंतच मुलींना शिकवत असत."
 
लढाई मोठी आहे
सीजीएम जसबीर कौर सांगतात, "त्या मुलींना पुन्हा भेटून बसच्या वेळेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
एवढे सगळे प्रयत्न करुनही आजही 15च मुली कॉलेजला जात आहेत. आजही अनेक मुलींसाठी कॉलेजला जाणं दूरचं स्वप्न आहे."
 
जानेवारी महिन्यातली एक थंडीने गारठलेली सकाळ. नैना आणि तिची बहीण राखी निळ्या पांढऱ्या रंगाच्या गणवेशात बसची वाट पाहत उभ्या होत्या.
 
राखी सांगते, "आज आम्ही कॉलेजला जात आहोत. आम्हाला वाटतं उद्या आमच्या छोट्या बहिणींनीही कॉलेजला जावं. गावातल्या अन्य मुलींनीही जावं. शिक्षण सगळ्यांसाठी आवश्यक आहे".
 
काही वेळेत बस आली आणि दोघीजणी कॉलेजसाठी निघून गेल्या.
 
ज्या मागे राहिल्या त्यांना अजूनही रुखरुख आहे. बारावीपर्यंतच शिकलेली कोमल सांगते, नैनाला पाहून कॉलेजला जावंसं वाटतं पण त्यावेळी घरच्यांनी ऐकलंच नाही.
 
हाच प्रश्न जवळच उभ्या असलेल्या काजलला आम्ही विचारला. तेव्हा बोलता बोलता ती रडू लागली.
 
जसबीर कौर सांगतात, "बदल एका रात्रीत होत नाही आणि तो सक्तीने घडवून आणता येत नाही. मला खात्री आहे की कॉलेजला जाणाऱ्या मुलींचा आकडा 15 पुरता मर्यादित राहणार नाही याची मला खात्री वाटते".

Published By- Priya Dixit