गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (11:42 IST)

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. ही परीक्षा MBBS, BDS आणि AYUSH अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या लॉकडाऊमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचे निर्देश दिले असल्याचे ट्विटमध्ये सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या या काळात घरी बसून परीक्षेचा अभ्यास करावा असे देखील आवाहन पोखरियाल यांनी केले आहे.
 
नीट परीक्षेची परीक्षा केंद्रे दूरवर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करून केंद्रावर जावे लागते. परीक्षेलाही लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका बसण्याची दाट शक्यता होती. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असल्याचे निर्देश आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. परिणामी खबरदारी म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
 
25 एप्रिल रोजी होणारी हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रवेश परीक्षेबाबत म्हणजेच JEE बाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. वेळापत्रकानुसार या विद्यार्थ्यांना 1 एप्रिल रोजी अॅडमिट कार्ड मिळणार आहे. मात्र, ही परीक्षादेखील लांबवणीवर पडण्याची शक्याता आहे.