शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (21:16 IST)

शेतकरी आंदोलन : सिंघू बॉर्डरवर मिळालेल्या लोंबकळत्या मृतदेह प्रकरणी दोघांना अटक

सिंघू बॉर्डरवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्या प्रकरणी अमृतसर ग्रामीण पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे. नारायण सिंग नावाच्या या आरोपीला अमरकोट येथील राख देविदास पुरा इथून अटक करण्यात आली.
 
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू बॉर्डरवर शुक्रवारी (15 ऑक्टोबर) एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. लखबीर सिंग नाव असलेल्या या व्यक्तीचे पाय तोडलेले होते आणि हाताच्या सहाय्याने मृतदेह लटकवलेला होता.
 
या गुन्ह्यामध्ये दोन जणांचा समावेश होता. त्यापैकी एकाला हरियाणा पोलिसांनी अटक केल होती. तर दुसरा आरोपी नारायण सिंग हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर त्याच्या तपासासाठी पथकं रवाना करण्यात आली होती. तो पोलिसांना शरण आला. मात्र हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचं, अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राकेश कौशल यांनी सांगितलं.
"आम्ही त्याला त्याच्या गावात गुरुद्वाऱ्याबाहेर अटक केली. पळून जाणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर तो बाहेर आला. याबाबत हरियाणा पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांचं पथक सोनिपतहून रवाना झालं आहे. नियमानुसार आम्ही आरोपीला त्यांच्या ताब्यात देणार आहोत. ते आले नाही, तर नियमाप्रमाणं आम्ही त्याची इथं चौकशी करू," असंही कौशल म्हणाले.
 
लखबीर यांची हत्या केल्याची कबुली त्यानं दिली आहे. लखबीरनं गुरु ग्रंथ साहीबचा अपमान केल्याचं सांगण्यात आलं तेव्हा राग अनावर झाला आणि त्यामुळं आरोपीनं लखबीरचे पाय कापले. त्यानंतर रक्तस्त्रावानं त्याचा मृत्यू झाला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
 
प्रकरण काय?
दिल्ली-हरियाणा सीमेवर सिंघू बॉर्डरवर शुक्रवारी (15 ऑक्टोबर) एक मृतदेह आढळला. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सना हा मृतदेह लटकलेला आढळला.
 
याबद्दल ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सोनीपतचे डीएसपी हंसराज यांनी सांगितलं होतं, "शुक्रवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास लोंबकळत असलेला हा मृतदेह सापडला. या व्यक्तीचे पाय छाटण्यात आले होते. शेतकरी निदर्शनं करत असलेल्या सोनीपतच्या हद्दीत हा मृतदेह आढळला."
 
हरियाणामधल्या सोनीपतच्या कुंडली पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
लखबीर सिंग असं या मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते पंजाबातल्या तरनतारन जिल्ह्याचे रहिवासी होते.
लखबीर सिंग त्यांच्या बहिणीसोबत रहायचे अशी माहिती स्थानिक पत्रकार दिलबाग दानिश यांनी दिली होती.
 
संयुक्त किसान मोर्चाने या घटनेचा निषेध केला करत म्हटलं होतं, "संयुक्त किसान मोर्चा या निर्घृण हत्येचा निषेध करतो. या घटनेतल्या दोन्ही बाजूंशी संयुक्त किसान मोर्चाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचं आम्ही स्पष्ट करतो.
 
"कोणताही धार्मिक ग्रंथ वा प्रतिकाचा अवमान करण्याच्या आम्ही विरोधात आहोत. या कारणावरून कायदा हातात घेण्याची कोणाही व्यक्ती वा गटाला परवानगी नाही. ही हत्या आणि अवमानाचा कट रचणाऱ्यांचा शोध घेण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."
 
लखबीर यांना लहान मुलं असल्याचं त्यांचे काका बलकार सिंग यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "घटनास्थळापासून आम्ही खूप दूर आहोत. काय घडलं हे आम्ही तुम्हाला काय सांगणार. तो तिथे स्वतःहून गेला असेल असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी नशेची गुंगी चढवून तिथे नेलं असावं. दोषींना पकडण्यात यावं आणि त्याच्या कुटुंबाची देखभाल करण्यात यावी."