सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:11 IST)

काँग्रेस बैठक : सोनिया गांधी म्हणतात, ऑक्टोबर 2022 पर्यंत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार

"मी 2019 पासून पक्षाची हंगामी अध्यक्ष आहे. पण आता अध्यक्षीय आणि पक्षातील इतर निवडणुका लवकरच होतील, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2021ला सुरू होईल, ऑक्टोबर 2022 पर्यंत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल," अशी घोषणा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. पक्षातील नेत्यांनी मीडियाच्या मार्फत बोलण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी जी-23 नेत्यांच्या समुहाला कानपिचक्या दिल्या आहेत.
 
काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सर्वसाधारण बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी गांधी यांचा रोख प्रामुख्याने पक्ष पुनर्बांधणी आणि तसंच शिस्तपालन या बाबींकडे असल्याचं दिसून आलं.
 
"येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. सगळ्यांनी शिस्त पाळली आणि पक्षाच्या हिताचे काम केले तर आपण चांगले काम करू, असा विश्वास सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान आपल्या भाषणात सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, "काँग्रेसची पुनर्बांधणी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत आहे. पण त्यासाठी आपली एकी आणि पक्षाचं हित महत्त्वाचं आहे. तसंच स्वतःवर नियंत्रण आणि शिस्त त्याहून महत्वाची आहे.
2019 पासून मी हंगामी अध्यक्ष आहे. पण आता अध्यक्षीय आणि पक्षातील इतर निवडणुका लवकरच होतील. गेल्या दोन वर्षात आपण आपल्या तरुण सहाकाऱ्यांकडे नेतृत्व दिलं आहे. त्या सगळ्यांनी शेतकरी, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक यांचे मुद्दे लोकांपर्यंत पोहचवले आहेत.
पक्षात मोकळेपणाने बोलणाऱ्यांचं आपण नेहमीच स्वागत केलं आहे. पण मीडियाच्या मार्फत बोलण्याची गरज नाही. आता आपण इथे खुली आणि प्रामाणिक चर्चा करू. पण या चार भिंतीच्या बाहेर जे काही सांगितलं जाईल त्यावर कार्यकारिणीचं एकमत असेल, असंही गांधी यांनी म्हटलं.
 
सोनिया गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
अध्यक्षीय आणि पक्षातील इतर निवडणुका लवकरच होतील.
पक्षात मोकळेपणाने बोलणाऱ्यांचं आपण नेहमीच स्वागत केलं आहे.
नेत्यांनी मीडियाच्या मार्फत बोलण्याची गरज नाही.
काँग्रेसची पुनर्बांधणी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत आहे.
पण त्यासाठी आपली एकी आणि पक्षाचे हित महत्त्वाचे आहेत.
सगळ्यांनी शिस्त पाळली आणि पक्षाच्या हिताचे काम केले तर आपण चांगले काम करू.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाकडून तयारी सुरू झालेली आहे.
पक्षाध्यक्ष निवडीसाठी वेळमर्यादा 30 जून 2021 निश्चित केली होती, पण कोरोनामुळे हे काम लांबलं.
मोदी सरकारवर निशाणा
तीन काळ्या कायद्यांच्या माध्यमातून मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा छळ.
अर्थव्यवस्था मोडकळीस आली, महागाई वाढली.
भाजपच्या कार्यकाळात गैर-भाजप राज्य सरकारांवर अन्याय.
लसीकरण धोरणावरही प्रश्नचिन्ह.
जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच हत्यासत्र सुरू झालं आहे.
मोदींच्या कार्यकाळात शेजारी देशांसोबतचे संबंधही बिघडले आहेत.
राहुल गांधी यांचा पुन्हा राज्याभिषेक होऊ शकतो का?
2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसला सातत्यानं विधानसभा निवडणुकीत, पराभवाचा सामना करावा लागत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी भलेही समाधानाकारक नसली तरी त्यांची मतांची टक्केवारी ही 2014 एवढीच म्हणजे, 20 टक्क्यांच्या आसपास होती.
 
मात्र, गेल्या एका वर्षात बिहार, आसाम आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांत त्यांची कामगिरी अत्यंत वाईट ठरली आहे. आघाडीसंदर्भातील पक्षाच्या निर्णयाला पक्षांतर्गतच आव्हान देण्यात आलं.
 
अशा परिस्थितीत राहुल गांधी पुन्हा एकदा राज्याभिषेकासाठी तयार होतील?
 
या प्रश्नाच्या उत्तरं देताना ज्येष्ठ पत्रकार पल्लवी घोष यांनी, राहुल गांधी अधिकृतरित्या जबाबदारी घेण्यासाठी सज्ज दिसत नाहीत, असं मत व्यक्त केलं. पल्लवी घोष सीएनएन न्यूज 18 मध्ये वरिष्ठ संपादिका आहेत. दोन दशकांपासून काँग्रेससंदर्भातील वृत्तांकन त्या करत आहेत. राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी अगदी सुरुवातीपासून पाहिलं आहे.
 
"पक्षाचं काम करण्यासाठी अध्यक्षपदावर असायलाच हवं, अशी गरज वाटत नसल्याचं, राहुल गांधी म्हणतात. त्यांच्या या संकोचामुळेच काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. दोन वेळा ती टाळण्यात आली. आणखी एक बाब म्हणजे, त्यांना त्यांच्या नव्या टीमसह अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान व्हायचं आहे. पण त्यासाठी सोनिया गांधी तयार नाहीत," असंही त्या म्हणाल्या.
 
राहुल गांधींना तरुण नेत्यांची टीम हवी आहे हे, काँग्रेसच्या आत आणि बाहेर असलेल्या सर्वांनाच माहिती आहे. सुष्मिता देव, जतीन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांना त्यांच्या टीममध्ये ठेवायचं होतं. पण एकापाठोपाठ हे सगळे काँग्रेस सोडून गेले आहेत. आता त्यांना जे नेते त्यांच्या टीममध्ये हवे आहेत, त्यात एनएसयूआयचे अध्यक्ष नीरज, युवक कांग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास, मणिकम टागोर, केसी वेणुगोपाल यांची नावं आघाडीवर आहेत.
 
"काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सध्याची वेळ योग्य नसल्याचा सल्ला, राहुल गांधींना त्यांच्या राजकीय सल्लागारांनी दिला आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब आणि उत्तराखंड अशा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात पंजाबमध्ये विजयाची आशा काही प्रमाणात होती. पण त्याठिकाणी प्रचंड अंतर्गत कलह आहे. त्यामुळं राहुल गांधी योग्य वेळेची वाट पाहत आहेत," असं पल्लवी घोष म्हणाल्या.
 
त्यामुळं आगामी काळातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे आडाखे बांधले जात आहेत.