गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (16:11 IST)

नवाब मलिक यांनी 'या' भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव जाहीर केले

Nawab Malik announced the name of BJP office bearer
मुंबई क्रूझ पार्टी आणि ड्रग प्रकरणी भाजपाच्या आदेशावरुन एनसीबी कारवाई करत असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप केला आहे. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी तिघांना सोडून देण्यात आलेलं आहे. त्यातला एक व्यक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यांनी आता या भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं आहे.
 
आपल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर करण्यासाठी नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. ते म्हणाले, एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात 
 
आलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव सुनावणीदरम्यान आलं आहे. या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला. या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचं नाव जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.