रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:49 IST)

शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदचे आवाहन

शेतकरी संघटनांनी आज भारत बंद  पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार केवळ चर्चा करत आहे. तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे.
 
दरम्यान, १८ विरोधी पक्षांनी या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बंदमुळे दिल्लीसह इतर राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरकीडे केंद्र सरकारने २० शेतकरी संघटनांना सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
 
भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूरमधील बाजार समित्याही बंदमध्ये सहभागी होणार आहेत.