आसाम मध्ये पुरामुळे आतापर्यंत 82 ठार, 48 लाख लोक बाधित
आसाममधील भीषण पूरस्थितीमध्ये मंगळवारी मृतांची संख्या 82 वर पोहोचली आहे. ब्रह्मपुत्रा, बराक तसेच राज्यातील इतर नद्यांना सातत्याने पूरस्थिती आहे. राज्यातील 36 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये सुमारे 48 लाख लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासांत सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरहून एनडीआरएफची टीम कचारमध्ये मदतीसाठी पोहोचली आहे. राज्यातील करीमगंज आणि कछार जिल्ह्यांमध्ये परिस्थिती आणखी वाईट आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, भुवनेश्वरहून एनडीआरएफच्या चार टीम सिलचरला पोहोचल्या आहेत. कचारमध्ये दोन लाख आणि करीमगंजमध्ये 1,33,865 लोक प्रभावित झाले आहेत.
ओडिशात गेल्या 24 तासांत सामान्यपेक्षा 81% जास्त पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या अंतर्गत भागात आणि किनारी भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.