गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 जुलै 2023 (15:10 IST)

गुजरात : जमिनीच्या वादावरुन दलित भावांची हत्या, राजकारण तापलं

murder
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील समधियाला गावात जमिनीच्या वादातून एका दलित कुटुंबातील दोघांची हत्या झाल्याची घटना बुधवारी (12 जुलै) समोर आली आहे.
या प्रकरणी आणखी 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
गुजरात पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
 
अमरभाई हरसुरभाई काछर, जुलूभाई उर्फ घुघाभाई काछर, मनुभाई अमरुभाई काछर, भिकूभाई भोजाभाई काछर आणि भानाभाई अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
 
गुजरातमध्ये या प्रकरणानं राजकीय वादाचं रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे.
 
काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर टीका करताना हा पक्ष दलितविरोधी असल्याचं म्हटलं आहे.
 
दुसरीकडे, या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
 
प्रकरण काय?
60 वर्षीय अल्जीभाई परमार आणि 54 वर्षीय मंजीभाई परमार यांच्यावर 10 ते12 जणांनी तलवारी व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना गेल्या बुधवारी घडली.
 
यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी चुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
पीडितेच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, आरोपी त्यांना सतत धमक्या देत होते. तसंच आरोपीच्या कुटुंबाला जमीन बळजबरीनं बळकावायची आहे, असंही ते म्हणाले.
 
अल्जीभाई परमार यांचा मुलगा जयेश परमार यांनी बीबीसीशी बोलताना आरोप केला की, "आम्ही गेल्या 70 वर्षांपासून या जमिनीवर शेती करत आहोत. आमच्या शेजारी राहणाऱ्या उच्च जातीच्या लोकांना ही जमीन ताब्यात घ्यायची आहे. त्यांनी आमच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.
 
"बुधवारी त्यांनी आमच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. आमचे पैसेही लुटले गेले. अल्जीभाईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला. माझे काकाही मरण पावले."
 
जयेश परमार पुढे सांगतात, "आम्हाला न्याय हवा आहे. माझे वडील राहिले नाहीत. माझे काकाही राहिले नाहीत. माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. आता हे घर कोण चालवणार?"
 
‘आधीही धमक्या आल्या होत्या'
याआधीही हल्लेखोरांनी त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
पीडित कुटुंबानं सांगितलं की, ते त्यांच्या बांधकाम व्यवसायानिमित्त अहमदाबादमध्ये राहत होते आणि ही जमीन अन्य कुणाला तरी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.
 
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनी यापूर्वीही पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं.
 
जयेश दावा करतात की, "धमक्या मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो तेव्हा तिथं तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक म्हणाले की, अशा गोष्टी सामान्य आहेत, तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही घरी जा."
 
पोलीस खात्याच्या निष्काळजीपणामुळे माझे वडील आणि काकांना जीव गमवावा लागला, असा त्यांचा आरोप आहे.
 
मंजीभाई यांचे पुतणे सुनीलभाई झाला यांनी सांगितलं की, "कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी मंजीभाई यांच्यावर होती. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी अमेरिकेत शिकत आहे आणि दुसरी मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलाचे वय फक्त पाच वर्षं आहे.
 
पोलीस अधिकाऱ्यांनी काय म्हटलं?
या प्रकरणी चुडा पोलीस ठाण्याच्या दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे.
 
आयजी रेंज अशोक कुमार यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "ही घटना वेदनादायक आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आम्ही चुडा पोलीस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांना निलंबित केलं आहे. पोलिस विभाग त्यांच्यावर कठोर कारवाई करेल.
 
"आम्ही विशेष सरकारी वकिलाची मदत घेऊ जेणेकरुन या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा होईल. या प्रकरणातील एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही."
 
"पोलीस विभाग पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल आणि या प्रकरणी सर्व आवश्यक पावलं उचलेल," असंही ते म्हणाले.
 
भाजप दलितविरोधी पक्ष, काँग्रेसची टीका
याप्रकरणी काँग्रेस पक्षानं राज्यातील सत्ताधारी भाजपला घेरलं असून हा पक्ष 'दलितविरोधी पक्ष' असल्याचं म्हटलं आहे.
 
काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल म्हणाले की, “भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं जाणीवपूर्वक दलित कुटुंबाच्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केलं. यामुळे समाजकंटकांना दलित कुटुंबावर हल्ला करून ठार मारण्याची संधी मिळाली. भूमाफियांपासून दूर राहण्यासाठी सुरक्षेची मागणी सातत्यानं केली जात होती, पण त्यांना सुरक्षा देण्यात पोलिस अपयशी ठरले.”
 
दरम्यान, दलित नेते सुरेंद्रनगर येथील रुग्णालयात येऊन कुटुंबाचं सांत्वन करत आहेत.
 
गुजरात दलित अत्याचारांची राजधानी बनत आहे, असं काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं आहे.
 
ते म्हणाले की, "गुजरातमध्ये दलित शेती करू शकत नाहीत आणि तुम्ही रामराज्य आणण्याचा दावा करत आहात."
 
दुसरीकडे, राज्य सरकार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचं म्हणत आहे. सरकारनं यासाठी विशेष तपास पथकही स्थापन केलं आहे.
 
गुजरात सरकारमधील मंत्री भानुभान बाबरिया यांनी या प्रकरणी आयजी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नंतर पीडित कुटुंबाची भेट घेतली.
 


Published By-Priya Dixit