मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , बुधवार, 13 डिसेंबर 2017 (09:18 IST)

गुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकांसाठीचा प्रचार समाप्त…

गुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकांसाठीचा प्रचार समाप्त झाला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर प्रखर टीका करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. तर कॉंग्रेसचे नवनियुक्‍त अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला करिष्मा पणाला लावला होता.
 
आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची अधिकृत सांगता झाली. निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर आणि मध्य गुजरातमधील 14 जिल्ह्यांमधील 93 जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांसाठी 851 उमेदवार रिंगणात आहेत. तर 2.22 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 9 डिसेंबरला झालेल्या पहिल्या टप्प्यामध्ये 89 जागांसाठी मतदान झाले होते. तेंव्हा 68 टक्के मतदान झाल्याची नोंद होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “होम पीच’ असल्याने गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसने सामाजिक पाटीदार, ओबीसी आणि दलित नेत्यांना हाताशी धरून सामाजिक आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातमधील एकूण लोकसंख्येच्या 12 टक्के असलेला पाटीदार समाज या निवडणूकीत महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्या समाजाचा नेता हार्दिक पटेलने कॉंग्रेसला पाठिंबा देऊन भाजपापुढे आव्हान उभे केले आहे.
 
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये विकासाचा मुद्दा मागे पडला आणि जातीय धार्मिक मुद्देच प्रभावी ठरू लागले. राज्याच्या निवडणूकीत पाकिस्तानचाही मुद्दा महत्वाचा केला गेला. मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या “डिनर मिटींग’ला पाकिस्तानी अधिकारी उपस्थित असल्याचा उल्लेख करून मोदींनी पाक हस्तक्षेपाचा आरोप केला. तर गुजरातच्या भविष्यासाठी काहीही योजना नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मूठभर उद्योजकांसाठी फायद्यचे राजकारण करण्याचा जूनाच आरोप राहुल गांधी पुन्हा पुन्हा केला.
 
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदी आणि राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिल्या. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत जगन्नाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर मोदी यांनी बनास्कांथा येथे अंबाजी मंदिरात दर्शन घेतले.
2012 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाला 115 तर कॉंग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या.