मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (16:53 IST)

हल्द्वानी हिंसाचार: स्वतःच्या घरात अडकलेले लोक आणि 'त्या' भागातील ठप्प जनजीवन

Haldwani Violence
उत्तराखंडच्या हल्द्वानी मधील बनभूलपुरा इथं गुरूवारी (8 फेब्रुवारी) हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर शहराच्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
 
हल्द्वानीमधील बनभूलपुरा इथं आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू असताना दगडफेकीला सुरुवात झाली. त्यानंतर तिथे हिंसाचार घडला.
 
या घटनेनंतर बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी या भागाचा दौरा केला.
 
हल्द्वानीमध्ये जिथे हिंसाचार घडला तिथे दोन दिवसांनंतर काय परिस्थिती आहे, याविषयी राघवेंद्र यांनी केलेला हा रिपोर्ताज.
 
शनिवारी (10 फेब्रुवारी) सायंकाळी उत्तराखंडमधील हल्दवनीच्या रस्त्यांवर असं वातावरण होतं की जणू तिथे काही घडलेच नाही.
 
लोक, वाहनं, काही उघडी दुकानं... रोजचं दृश्य.
 
पण या शहराचा एक कोपरा असाही होता, जिथले बहुसंख्य लोक स्वतःच्या घरात, रस्त्यावर आणि परिसरात कैद झाले होते.
 
हा तोच कोपरा आहे, जिथे गुरुवारी (8 फेब्रुवारी) संध्याकाळी हिंसक जमावाने दगडफेक केली. वाहने पेटवली आणि पोलिसांवर हल्ला केला. त्याठिकाणी झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक जखमी झाले.
 
आता ते ठिकाण चारही बाजूंनी एवढं बंद करण्यात आले आहे की ना आता जाता येत आहे आणि कोणी बाहेरही येऊ शकत नाही.
 
त्या परिसराचं नावं आहे, बनभूलपुरा.
 
'अनेक महिने घरात राहण्याची तयारी करा'
शुक्रवारी (9 फेब्रुवारी) संध्याकाळी हल्द्वानीला पोहोचल्यानंतर आम्ही थेट बनभूलपुराकडे निघालो.
 
मात्र, या भागाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पोलिस तैनात करण्यात आले होते.
 
आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक पोलीस अधिकारी म्हणाला, "कर्फ्यू आहे. प्रेसला आत जाण्यास मनाई आहे. वरून आदेश आहेत."
शनिवारी (10 फेब्रुवारी) आम्ही आणखी एक प्रयत्न केला. पण पोलिसांचे उत्तरही तेच होते.
 
बनभूलपुरा, गांधी नगर, आझाद नगर आणि गफूर बस्ती हे लगतचे भाग आहेत आणि ते सर्व गुरुवारच्या हिंसाचाराने प्रभावित झाले आहेत.
 
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या भागात मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.
 
गुरुवारचा हिंसाचार मुद्दाम आणि सुनियोजित होता असे अनेकांचे मत आहे. तसंच हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असं जिल्हा प्रशासनानेही म्हटलं आहे.
 
त्यानंतर पोलिसांनी प्रत्येक गल्ली-बोळात अशा प्रकारे नाकाबंदी केली आहे की, या भागात पोहोचणेही अशक्य झाले आहे.
त्याचबरोबर या भागात राहणारे लोक बाहेर पडू नयेत, याचीही काळजी पोलीस घेतायत.
 
आम्ही अशाच एका ब्लॉकवर उभे होतो तेव्हा आम्हाला बनभूलपुराच्या बाजूने काही लोक बाहेर येताना दिसले.
 
तेवढ्यात जमिनीवर दंडुका मारत एका पोलिसाने त्यांना दटावलं, "परत जा."
 
ते परत जाण्यासाठी वळताच पोलीस शिपाई ओरडला, "अनेक महिने आत राहण्याची तयारी करा."
 
दंगलखोरांची ओळख कशी पटवली जातेय?
या प्रकरणी आतापर्यंत तीन FIR दाखल करण्यात आल्या असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचं काम सुरू आहे.
 
तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
 
शनिवारी (10 फेब्रुवारी) एका जाहीर सभेत बोलताना धामी म्हणाले की, "देवभूमीवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार, किंवा कोणत्याही प्रकारची अराजकता खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी सर्वोतपरी उपाय केले जातील.”
 
त्यांनी पुढे म्हटलं की, "बनभूलपुरामध्ये ज्यांनी सरकारी मालमत्तेचे किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान केले आहे, त्यातील प्रत्येक पैसा त्या दंगलखोरांकडून वसूल केला जाईल. त्या अराजक घटकांकडून, मग तो कितीही मोठा असो, कितीही प्रभावशाली कोणीही असो. ज्याने हे केले... ज्याने कायदा मोडला, कायदा त्याच्यावर कठोरपणे काम करेल...न थांबता, न झुकता.”
 
कुठे कर्फ्यू, कुठे नाही?
शनिवारी (10 फेब्रुवारी) सकाळचे दृश्यं काहीसे विचित्र होते. बनभूलपुराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून अडवले होते.
 
त्याचवेळी शहरातील प्रमुख मार्ग आणि टिकुनिया तिठ्यावर लोक नेहमीप्रमाणेच फिरताना दिसत होते.
 
टिकुनिया तिराहा या भागातील कर्फ्यू हटवण्यात आला आहे का? असं आम्ही पोलिसांना विचारलं. तेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, "अजून कुठेही कर्फ्यू हटवण्यात आलेला नाही. लोकांमध्ये माहितीचा अभाव असावा."
 
काही वेळातच पोलीस दल सक्रीय झालं आणि लोकांना थांबवून त्यांना परत जाण्यास सांगू लागले. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ई-रिक्षाचालकांचा पाठलाग सुरू केला.
 
पोलिसांच्या वाहनांमधून लाऊड ​​स्पीकरवर घोषणा दिल्या जाऊ लागल्या की, कर्फ्यू अजूनही सुरू आहे आणि लोकांनी त्यांच्या घरी परतावं.
कर्फ्यू लागू करणं हे स्थानिक पोलिसांसाठी सोपं काम नव्हतं.
 
आम्ही एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की, याठिकाणी कर्फ्यू नाही असं वाटतंय, तेव्हा त्यांनी म्हटलं, "इथंही आहे. पण बनभूलपुरा भागात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जात आहे."
 
तिथेच तैनात असलेले दुसरे पोलीस कर्मचारी म्हणाले, "गुरुवारची रात्र (हिंसाचाराची रात्र) फार भयानक रात्र होती. मग त्या भागातील लोकांवर आता दया कशी दाखवली जाईल?”
 
जसजसा शनिवारचा दिवस पुढे सरकत गेला तसतशी बातमी आली की, कर्फ्यू हिंसाचार प्रभावित भागातपुरताच मर्यादित आहे.
 
संध्याकाळपर्यंत हल्दवानी शहरातील बहुतेक भाग सामान्य स्थितीकडे जाताना दिसला.
 
शुक्रवारी (10 फेब्रुवारी) रात्रीपर्यंत केवळ औषधांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असताना शनिवारी सायंकाळपर्यंत शहरात अनेक दारुची दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.
 
हल्दवानीमधील मोठ्या लोकसंख्येचे जीवन पुन्हा रुळावर आल्याचे दिसत होते.
 
पण जे लोक आपल्याच घरात कैद झाले आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला काहीच समजू शकलं नाही.
 
Published By- Priya Dixit